सोलापूर-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाला फेरमोजणीमुळे तात्पुरती खीळ बसली आहे. जिल्ह्यातील ४२पकी २८ गावांतील जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले, मात्र उस्मानाबाद शहरासह १४ गावांतील भूसंपादन प्रक्रिया रखडली. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला फेरमोजणीमुळे खीळ बसली आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११च्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. तामलवाडी ते सरमकुंडीपर्यंत ४२ गावांमधील तब्बल ३७४.९९ हेक्टर जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. पकी २८ गावांतील १७७.५२ हेक्टर जमिनीच्या मोबदल्यापोटी ४० कोटी ५८ लाख रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आला. प्राप्त निधीच्या ४० टक्के मावेजाचे आतापर्यंत वाटप करण्यात आले. काही त्रुटींमुळे जिल्ह्यातील १४ गावांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव रखडले. उस्मानाबाद शहराचाही त्यात समावेश आहे. याव्यतिरिक्त २२ गावांमधील ६३.७४ हेक्टर अतिरिक्त भूसंपादनाचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर झाले. कागदावर नोंदविलेले क्षेत्र आणि संपादित होणारे क्षेत्र यात मोठी तफावत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. त्यानुसार सर्व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी भूसंपादन विभागाने पुन्हा एकदा उर्वरित १४ गावांमधील क्षेत्राची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी दोन वेळा मोजणी होऊनही पुन्हा तिसऱ्यांदा हा प्रश्न निर्माण झाला आहे. संपादित होणाऱ्या क्षेत्राची मोजणी शेतकऱ्यांच्या गरहजेरीत केली जात असल्याच्याही तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांचे समाधान होत नाही, तोवर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही, अशी माहिती भूसंपादक विभागाचे उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली. १४पकी ८ गावांच्या फेरमोजणीचे प्रस्ताव नव्याने दाखल झाले. उर्वरित गावांमधील प्रस्तावांची पूर्तता झाल्यानंतरच प्रत्यक्ष भूसंपादन केले जाणार आहे. या क्षेत्राच्या मावेजासाठी लागणारी संपूर्ण रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. केवळ फेरमोजणीमुळे प्रक्रिया सध्या थांबली आहे. सर्व प्रक्रियेला किमान ४ महिन्यांचा तरी कालावधी लागेल, असा अंदाज भूसंपादन विभागाच्या वतीने वर्तविला जात आहे.
जिल्ह्यातील ४२ गावांतून हा महामार्ग जात आहे. २८ गावांतील काम सध्या वेगात सुरू आहे. उर्वरित १४ गावांतील काम मात्र फेरमोजणी प्रक्रियेमुळे रखडले आहे. यात उस्मानाबाद शहरासह तामलवाडी, येडशी, चोराखळी, तेरखेडा, बोरी, इंदापूर, वाशी, सरमकुंडी, रुई, पारगाव, इजोरा, लोणखस, पार्डी आणि वडगाव जहागीर या गावांचा समावेश आहे.
‘वर्षभरात टप्पा क्रमांक दोनची कामे पूर्ण’
उस्मानाबाद शहरातील मोजणीत मूळ लेआऊट दर्शवले नव्हते. त्यामुळे सíव्हस रोड, मोकळी जागा असे सर्वच क्षेत्र भूसंपादनासाठी मोजले जात होते. ते वगळून उर्वरित क्षेत्राचा मावेजा जागामालकांना दिला जाईल आणि उर्वरित संपादित क्षेत्राची रक्कम सरकारदप्तरी जमा केली जाईल. ते काम सध्या सुरू आहे. मोजणी पूर्ण झाली, तेथील काम सुरू झाले. शहरातील शेकापूर-वडगाव दरम्यानचे काम सध्या सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून टप्पा दोनचे काम पूर्ण होण्यास किमान वर्ष लागेल, असे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले.