21 September 2020

News Flash

महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरीत भूसंपादन सुरू

मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते झाराप टापूच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

| October 1, 2013 04:13 am

मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते झाराप टापूच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या टापूचे इंदापूर ते कशेडी (७७ किलोमीटर), कशेडी ते संगमेश्वर (१०४ किमी), संगमेश्वर ते राजापूर (८६ किमी) आणि राजापूर ते झाराप (९९ किमी) अशा एकूण ३६६ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणासाठी चार प्रांताधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या टापूतील महामार्गालगतच्या सात तालुक्यांमध्ये मिळून एकूण १३० गावांच्या हद्दीतील भूसंपादन करावे लागणार आहे. त्यांची तालुकावार संख्या पुढीलप्रमाणे – खेड २२ गावे, चिपळूण १२, संगमेश्वर २२, रत्नागिरी १२, राजापूर २०, कणकवली २३ आणि कुडाळ १९. या गावांच्या हद्दीतील सध्याच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मिळून किमान ४५ मीटर ते कमाल ६० मीटर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी काही ठिकाणी बांधकामाच्या रचनेमध्ये बदल सुचवण्यात आले असले तरी कोणत्याही गावाच्या हद्दीत उड्डाण पूल किंवा बाह्य़वळण मार्गाची योजना नाही. त्यामुळे संगमेश्वर, पाली, लांजा, कणकवली या चार ठिकाणी सध्या असलेल्या बाजारपेठा आणि बस स्टॅण्ड अन्यत्र हलवणे भाग पडणार आहे.
सध्या मुंबईकडून इंदापूपर्यंत ८४ किलोमीटरचे आणि पत्रादेवी ते झाराप या २१ किलोमीटर टापूचे चौपदरीकरण प्रगतिपथावर आहे. पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 मात्र उरलेल्या ३६६ किलोमीटर मार्गासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाकडे पाठवून मंजुरी घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही करून जमीन ताब्यात घेण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता या टापूचे काम सुरू होण्यास किमान २ ते ३ वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे. मात्र संपूर्ण काम ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर होणार असल्याने सरकारी निधी उपलब्ध असण्याचा प्रश्न येणार नाही. म्हणून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम वेगाने होऊ शकेल, अशी आशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 4:13 am

Web Title: land acquisition work started to make four lane highway in ratnagiri
टॅग Land Acquisition
Next Stories
1 शासकीय योजना ऑनलाइन केल्याने जनतेचे प्रश्न सुटतील-राधाकृष्ण विखे
2 जिल्हा विभाजनास राष्ट्रवादीचा पाठिंबा- आ. पाचपुते
3 अजित पवार आणि कंपनीला तुरुंगात पाठवू – मुंडे
Just Now!
X