तीन हेक्टरसाठी ११ कोटींचा मोबदला

लक्ष्मण राऊत, लोकसत्ता

जालना : मराठवाडय़ाची गणना नेहमीच मागास म्हणून केली जाते. शेतीच्या समस्यांमुळे ते वास्तव नाकारता येत नसले तरी विविध सरकारी प्रकल्पांमुळे जालना शहराजवळील शेत जमिनीस सोन्याचा भाव आला आहे. अलीकडेच ड्राय पोर्टसाठी तीन हेक्टर ८७ आर जमिनीस मिळालेला मोबदला ११ कोटी ६३ लाख २ हजार ५०० रुपये होता. केवळ एकाच प्रकल्पासाठी नाही तर सरकारकडून भूसंपादनाचा मोबदला सोन्याहून अधिक मोलाचा गणला जात आहे.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) ‘ड्रायपोर्ट’ जालना शहरापासून जवळ दरेगाव आणि जवसगाव शिवारातील १७२ हेक्टरवर उभारण्यात येत आहे. ड्रायपोर्ट ते औरंगाबाद-जालना महामार्गाच्या जोडरस्त्यासाठी ३ हेक्टर ८७ आर खासगी जमीन संपादित करण्यात आली असून त्याच्या मोबदल्याची एकूण रक्कम ११ कोटी ६३ लाख २ हजार ५०० रुपये आहे. यापैकी १० कोटी ६१ लाख ९४ हजार मोबदल्याचे वाटप झालेले आहे. याच जोडरस्त्यासाठी ५ हेक्टर ६५ आर महसूल खात्याची सरकारी जमीन ‘जेएनपीटी’ने संपादित केली असून त्याबद्दल ३ कोटी १८ लाख ८२५ रुपये मोबदला सरकारकडे जमा केला आहे. ड्रायपोर्टला लोहमार्गास जोडण्यासाठी अंदाजे १ कोटी ५५ लाख १९ हजार २९५ रुपये लागणार असून वाटाघाटीद्वारे खासगी जमीन थेट खरेदी पद्धतीने ‘जेएनपीटी’ संपादित करणार आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जालना जिल्ह्य़ातील ५१० हेक्टर ७२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे. यापैकी ७५ हेक्टर ७१ आर जमीन शासकीय असून उर्वरित शेतजमीन आहे. यापैकी ३४७ हेक्टर खासगी शेतजमीन थेट वाटाघाटीद्वारे, तर ८८ हेक्टर खासगी जमीन राज्य महामार्गाच्या संदर्भातील भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार संपादित करण्यात आली आहे. या मार्गासाठी संपादित केलेल्या एकूण ४३५ हेक्टर खासगी शेतजमिनीसाठी ५०५ कोटी ४८ लाख रुपये मोबदला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित जमीन मालकांना दिला आहे.

समृद्धी महामार्गाच्या १ हेक्टर ९३ आर बागायती शेतजमिनीसाठी अहंकार देऊळगाव येथील एका शेतकऱ्यास ८ कोटी ५० लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. हा मोबदला केवळ जमिनीचा नसून त्यामध्ये १ हजार २० आंब्यांची झाडे, २५ कडुलिंबाची झाडे, तार कंपाऊंड, त्याचप्रमाणे विंधन विहिरी, जलवाहिनी आणि ठिबक सिंचन संचाच्या मूल्याचा समावेश या एकूण मोबदल्यात आहे. या महामार्गासाठी संपादित कोरडवाहू शेतजमिनीसही काही ठिकाणी ३५ लाख रुपये हेक्टपर्यंत मोबदला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिला आहे.

समृद्धी महामार्गासाठी कडवंची गावाच्या शिवारात ३१ हेक्टर २१ आर जमीन थेट वाटाघाटी आणि भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार संपादित करण्यात आली आहे. त्यासाठीचा एकूण मोबदला ४१ कोटी २० लाख रुपये एवढा आहे. फळबागा असणारी जमीन यामध्ये आहे. वाटाघाटीद्वारे संपादित करण्यात आलेल्या कडवंची येथील द्राक्षाची बाग असलेल्या ३२ आर  जमिनीस १ कोटी २० लाख रुपये मोबदला मिळाला आहे. तर वरुड गावाच्या शिवारातील द्राक्ष बाग असलेल्या ४० आर जमिनीस १ कोटी ७८ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे.

जालना शहराजवळील खरपुडी गावाच्या शिवारात ‘सिडको’चा गृहप्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी ३१५ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी ५८ हेक्टर ६६ आर शेतजमीन आहे. २३५ हेक्टर संभाव्य बिगरशेती जमीन तर २० हेक्टर बिगरशेती जमीन आहे. ‘सिडको’साठी संपादित करावयाच्या यापैकी संभाव्य बिगरशेती जमिनीच्या संपादनासाठी १ हजार २५० रुपये प्रतिचौरस मीटर तर बिगरशेती जमिनीसाठी प्रतिचौरस मीटर १ हजार ७५० रुपये दर भूसंपादन करणाऱ्या महसूल यंत्रणेने सुचविला आहे.

शासनाशी संबंधित प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यासाठी नियम आहेत. रस्ता किंवा अन्य प्रकल्पांसाठी शेती, संभाव्य बिगरशेती आणि बिगरशेती अशा प्रकारची जमीन संपादन करताना वेगवेगळे दर लागतात. जमीन मालकाशी थेट वाटाघाटी करून एखाद्या भागातील रेडीरेकनर तसेच त्या क्षेत्रात खरेदी-विक्री झालेल्या जमिनीच्या दराचा विचार केला जातो. बागायती जमीन आणि त्यावरील फळबागा तसेच कोरडवाहू जमिनीच्या संदर्भात वेगवेगळे दर लागू केले जातात. शेत जमिनीचे दर ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. भूसंपादनाच्या शासकीय नियमानुसार जमिनीच्या खरेदीचा मोबदला ठरविण्यात येतो. त्या-त्या भागातील उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना भूसंपादनाचे अधिकार आहेत.

– गणेश निऱ्हाळी, भूसंपादन उपजिल्हाधिकारी, जालना