सरकारी यंत्रणेच्या बेपर्वाईला कंटाळून माजी आमदार अशोक काळे यांनीच वाळूतस्करांच्या विरोधात मोहीम उघडली. रविवारी सायंकाळनंतर त्यांनी स्वत:च गोदावरी नदीपात्रात उतरून बेकायदेशीररीत्या वाळूउपसा करणारी तब्बल ५० वाहने पकडून दिली. त्यांच्या मोहिमेचे तालुक्यात स्वागत करण्यात येत आहे.
काळे यांनी रविवारी सायंकाळी कुंभारी येथे नदीपात्रात उतरून वाळूउपसा करणारी वाहने पकडण्यास सुरुवात केली. सोमवारी पहाटेपर्यंत त्यांची ही मोहीम सुरू होती. कुंभारी येथे ३ हजार ब्रास वाळू उपसण्याचा लिलाव झाला आहे. प्रत्यक्षात येथून आत्तापर्यंत तब्बल एक लाख ब्रासपेक्षाही अधिक वाळू उपसण्यात आल्याची माहिती नंतर काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
काळे यांनी महसूल यंत्रणेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, बेकायदेशीर वाळूउपशाला महसूल यंत्रणेचा आशीर्वाद आहे. तस्करांची वाढती दादागिरी, त्याला महसूल प्रशासनाची मिळणारी साथ, या सर्वच गोष्टी गंभीर आहे. वाढत्या वाळूउपशामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याचे नसर्गिक स्रोत घटू लागले आहे. त्यामुळे पर्यावरण व शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. गोदापात्रातील वाढती वाळूतस्करी ही भविष्यातील पाण्याचे मोठे संकट आहे. या वाळूतस्करीमुळे शेती व जलवाहिन्यांचेही प्रचंड नुकसान झाले. ज्येष्ठ नेते (स्व.) शंकरराव काळे यांनी या वाळूतस्करीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून मनाई हुकूम घेतला होता. मात्र महसुलापोटी या वाळूठेक्यांचे पुन्हा लिलाव करण्यात आले. मात्र लिलावापेक्षा कितीतरी अधिक वाळूउपसा सुरू आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी व संबंधितांचे वारंवार याकडे लक्ष वेधूनही कोणतीच कारवाई न झाल्याने आपल्यालाच ही कारवाई करावी लागली, असे काळे यांनी सांगितले. तालुक्यात ७९ गावे असून त्यातील ३० गावे गोदावरी काठी आहेत. येथे वाळूतस्करांचा हैदोस सुरू आहे. मात्र आता आपण स्वत: त्याविरोधात संघर्ष सुरू केला असून तो सुरूच राहील. सरकार व प्रशासनातील वरिष्ठांचेही याकडे लक्ष वेधणार आहोत, असे त्यांनी सांगितले.