बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी विकण्याचे प्रकार

हर्षद कशाळकर, अलिबाग

रायगड जिल्ह्य़ात जागा घेण्याचा विचार करत असाल तर सावधान..जिल्ह्य़ात जमिनीशी निगडित फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन वर्षांत ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनी विकण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सरकारी जमिनीच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जागा खरेदी-विक्री करताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा राज्याचा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ येथील शहरीकरणाला वेग आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. ही गुंतवणूक संधी लक्षात घेऊन जागा जमिनींच्या खरेदी-विक्रीला वेग आला आहे. मुंबई-पुण्यातून हजारो गुंतवणूकदार जागांच्या शोधात जिल्ह्य़ात दाखल होऊ  लागले आहेत.

फसवणुकीचे ४० गुन्हे

जिल्ह्य़ात जागा जमिनींच्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. दोन वर्षांत जमीन फसवणुकीशी निगडित ४० गुन्हे दाखल झाले आहेत. यात २०१८ मधील ३१ तर २०१९ मधील ९ प्रकरणांचा समावेश आहे. यात माणगाव (१५), नेरळ (१०), महाड (३), पाली (३), रोहा (२), खालापूर  (२), तळा (२) तर कर्जत, मांडवा आणि पोयनाड येथील प्रत्येकी एक गुन्ह्य़ाचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची खरेदी-विक्री करणे, बोगस खातेदार उभे करून जागा विक्री करणे, मृत आणि स्थलांतरित कुटुंबांच्या जागांची परस्पर विक्री करणे, महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकारी जमिनींची विक्री करणे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

अधिकाऱ्यांचे निलंबन : रोहा तालुक्यातील दिव येथे सरकारी खाजण जमिनीवर, खोती चढवून नंतर त्याला कूळ लावून त्या जागेची परस्पर विक्रीचे एक प्रकरण नुकतेच समोर आले. यात जवळपास साडेतीनशे एकर सरकारी जागा विकण्यात आली होती. यात तत्कालीन नायब तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले. दुय्यम निबंधक कार्यालयानेही या जमिनींचे व्यवहार नोंदवून घेतले. कुळांची दलालांकडून फसवणूक झाल्याचे समोर आले. सर्वहारा जनआंदोलन समितीने या जमीन घोटाळ्याला वाचा फोडल्यानंतर हे सर्व व्यवहार रद्द करण्यात आले. तर तत्कालीन नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात आले.

जमीन परस्पर विकली :

याच परिसरात आधार कार्डातील दुरुस्ती सुविधेचा गैरवापर करून मृत आणि स्थलांतरित व्यक्तीच्या नावावरील जमिनी परस्पर विकल्याचे एक प्रकरण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने समोर आणले. रोहा तालुक्यातील चांडगाव येथील सुशील भरतु आणि शेडसई येथील ओमप्रकाश वसिष्ठ यांच्या जमिनींचे परस्पर व्यवहार करण्यात आले आहेत. हे व्यवहार करण्यासाठी आरोपींनी स्वत:च्याच आधारकार्डावरील व पॅनकार्डावरील स्वत:चेच नाव बदलून घेतले आणि मूळ जमीनधारक म्हणून स्वत:च उभे राहिले. शिवाय मूळ जमीनधारकांच्या नावाने बनावट बँक खाती उघडून जमीन विकून आलेली रक्कम त्या खात्यांमध्ये जमा करून घेतली.

जमिनीचे व्यवहार करताना मूळ मालक, जमिनीचे कागदपत्रे, सर्चरिपोर्ट पाहून, स्थानिकांशी चर्चा करून व्यवहार करणे गरजेचे आहे. अन्यथा फसवणूक होऊ शकते. पोलिसांकडून अशा प्रकरणामध्ये कारवाई सुरू आहे.

 – अनिल पारस्कर , जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड</strong>