ब्लू बेरी रिअल इस्टेट लिमिटेड नावाची बोगस एजन्सी सुरू करून दोन भामटय़ांनी भद्रावतीतील २३ लोकांना ११ लाखांनी गंडा घातला. भूखंडाचे आमिष दाखवून या नागरिकांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अजय नामदवे गावड, रमेश नरसय्या बोंकुर या दोघांनी ब्लू बेरी रिअल इस्टेट नावाची बोगस एजन्सी स्थापन केली. सुमठाणा परिसरात स्वस्त दरात भूखंड असल्याचे सांगून त्याची विक्रीही त्यांनी केली. ते बघण्यासाठी येणाऱ्यांना भेटवस्तू देण्याचे आमिषही त्यांनी दाखविले. याला बळी पडून २३ जणांनी त्यांच्याकडून भूखंड खरेदीसाठी करारनामा केला.
सर्वानी प्रत्यक्ष भूखंड पाडलेल्या जागेची पाहणीही न करता केवळ कागदोपत्री दाखविलेल्या नकाशाच्या आधारेच करारपत्र केले. यानंतर या दोघांनी वेगवेगळी कारणे सांगून भूखंडधारकांकडून पैसेही वसूल केले. या पैशाचा पावत्या त्यांनी काही जणांना दिल्या. मात्र काही जणांना संशय आला. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा काहीच दिसून आले नाही. त्यामुळे सर्व २३ जणांनी भद्रावती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, अजय गावड, रमेश बोंकुर सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.