सातारा सातारा जिल्ह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा. त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागेंचा शोध घ्यावा. तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित जागेबाबत तज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज(सोमवार) केल्या.

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी, पुरस्थितीसह भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

या आढावा बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तुटलेल्या गावांचा संपर्क पुर्ववत होण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची कामे तत्काळ करा. त्यानंतर कायमस्वरुपी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील काही रस्त्यांवर ब्रिटीश कालीन मोऱ्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचारा होऊ शकला नाही. यापुढे अशा ठिकाणी ब्लॉक पद्धतीने किंवा स्लँब टाकून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी.

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख, केंद्र शासनाकडून २ लाख  –

या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. खंडीत वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी आज १०० कर्मचाऱ्यांची टीम काम करीत आहेत. त्यांना ज्या काही बाबी लागणार आहेत त्या उपलब्ध करुन द्या. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख, केंद्र शासनाकडून २ लाख व शेतकरी असल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून २ लाखाचाही लाभ देण्यात यावा. ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यात किंवा खराब झाल्या आहेत अशा गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा.

घरांचे, शेतीचे, पशुधनाचे तसेच शासकीय मालमत्तेचे पंचनामे लवकरात लवकर करा. ज्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे त्यांना अन्नधान्य, औषधे व इतर बाबी द्या. मदत करीत असताना कोणत्याही तांत्रिक बाबी अडचण येणार नाहीत असे प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केल्या.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही सुरु  –

जिल्ह्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिवीत हानी, शेत जमिनीचे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. भूस्खलन झालेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. जिल्ह्याचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केली.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. या बैठकीत आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.