22 November 2019

News Flash

‘वैतरणा जलविद्युत’च्या प्रवेशद्वारावर दरड कोसळली

घोटीपासून काही अंतरावरील वैतरणा धरणावर महाजनकोचा विद्युत प्रकल्प आहे

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दरड कोसळली. (छाया -जाकीर शेख)

रस्ता बंद झाल्याने वीजनिर्मितीला फटका

नाशिक : मुसळधार पावसात गुरूवारी सकाळी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दरड कोसळली. पोलीस कर्मचारी, सुरक्षारक्षकांनी सतर्कता राखून वेळीच सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने ते थोडक्यात बचावले. वीज प्रकल्पाकडे जाणारा रस्ताही दरड कोसळल्याने बंद आहे. यामुळे मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पातील वीज निर्मिती थांबविण्यात आली आहे.

घोटीपासून काही अंतरावरील वैतरणा धरणावर महाजनकोचा विद्युत प्रकल्प आहे. धरणातील पाण्यावर येथे वीज निर्मिती केली जाते. डोंगरालगत हा प्रकल्प आहे. रात्रीपासून परिसरात पाऊस सुरू असतांना सकाळी सहाच्या सुमारास डोंगरावरून काही दगड, माती खाली येऊ लागले. मुख्य प्रवेशद्वारावरील चौकीतील पोलीस, सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी विलंब न करता सुरक्षितस्थळी धाव घेतली. नंतर काही वेळातच दरड कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली परिसरात उभी असणारी वाहने सापडल्याचे सांगितले जाते. प्रवेशद्वारावरील दोन चौक्यांचे नुकसान झाले. दरड कोसळल्याने वीज निर्मिती केंद्राकडे जाणारा रस्ता बंद झाला. कामगारांना सेवा देणारे वाहन रस्त्यात अडकले. या घटनेची माहिती समजल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. वैतरणा ते वीज निर्मिती केंद्र यामध्ये १० किलोमीटरचे अंतर आहे. त्या मार्गावर पाणी, मातीचा भराव पडल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. महाजनकोचे पथक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह, प्रांताधिकारी राहुल पाटील, उपअधीक्षक माधव वडिले आदींनी भेट देऊन पाहणी केली. वीज निर्मितीचे काम तूर्तास थांबविण्यात आले आहे.

First Published on July 12, 2019 2:16 am

Web Title: landslide at vaitarna power plant gate in igatpuri taluka zws 70
Just Now!
X