News Flash

महाबळेश्वर-तापोळा, सातारा-कास रस्त्यावर दरड कोसळली!

महामार्गावरही पाणी साठले वाहतूक संथ गतीने सुरू; सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

दरड कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

साताऱ्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. दरम्यान, आज मुसळधार पावसामुळे केळघर घाटातून महाबळेश्वरला जाणारी वाहतूक दरड काेसळल्याने धिम्या गतीने सुरु हाेती. याबराेबरच महाबळेश्वर तापाेळा रस्त्यावर दरड काेसळल्याने वाहतूक ठप्प झाल्याचेही दिसून आले. तसचे, सातारा कास रस्त्यावरही दरड कोसळली आहे.

मागील काही दिवसांपासून सातारासह महाबळेश्वर,पाचगणी,वाई कास पठार आदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावर ही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले आहे .संततधार पावसामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे .सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

दरम्यान, सातारा-कास रस्त्यावर आज दुपारी अचानक दरड कोसळून मोठमोठाले दगड रस्त्यावर आले. या रस्त्यावर नियमितपणे वर्दळ असते, मात्र दगड रस्त्यावर येत असताना कोणतेही वाहन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कास परिसरातील प्रसिद्ध असलेल्या एकीव धबधब्याचे पाणी देखील रस्त्यावर आले आहे.  तर, महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर वाघेरा (महाबळेश्वर)या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्यानंतर स्थानिकांनी दगड, माती हलवून रस्ता पूर्ववत केला. मायणी भागात पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत आहे. जावळी तालुका परिसरात रात्री पासून संततधार पाऊस पडत आहे. खटाव तालुक्यात आज (गुरुवार) पहाटे पासून पावसाने हजेरी लावली असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील दोन-तीन दिवस रात्रीचाही मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिदुर्गम क्षेत्रात वसलेल्या म्हारवंडकर (ता.कराड) बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावात येणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन झाल्याने कड्याच्या मातीचा ढिगारा कोसळला आहे. येथील मातीचा राडारोडा व पाणी लोकांच्या घरात घुसले असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज –

सातारा जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी एकूण ४६.८ मिली मीटर पाऊस पडला आहे. आतापर्यंत सरासरी १४३.२ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे . महाबळेश्वर तालुक्यात २११.८ (६२३.१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली .वाई २८ मिमी (२६० मिमी एकूण)येथे तर खंडाळा ८६.१०(८८.७५)सातारा ४० (१४६.६) , जावळी ८०.२ (२३०.९) मी मी पाऊस झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली. सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 7:58 pm

Web Title: landslide on mahabaleshwar tapola satara kas road msr 87
टॅग : Heavy Rainfall
Next Stories
1 आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश! शिक्षण विभागाचा निर्णय
2 …म्हणून देशातील रामभक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी – जयंत पाटील
3 अल्पसंख्याक विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाला मान्यता, लवकरच बांधकाम सुरु होणार- नवाब मलिक
Just Now!
X