News Flash

महामार्गावर दरडींचा धोका

मुंबई-अहमदाबाद मार्गावर दरड अपघात प्रतिबंधक उपाययोजनाच नाही

मुंबई-अहमदाबाद मार्गावर दरड अपघात प्रतिबंधक उपाययोजनाच नाही

नितीन बोंबाडे, डहाणू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर ढिगारे, अर्धवट कामे असताना आता पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती आहे. महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी केलेले दुर्लक्ष वाहतूकदारांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानीवरी, मेंढवण-खानिवडा टोलनाका, ढेकाळे  येथे अनेक भागात डोंगर कपारीतून मोठमोठाले दरड निखळून महामार्गावर कधी कोसळतील याची शाश्वती नसल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले.

अनेक ठिकाणी तीव्र वळणांवर दगड, माती मुरूम  महामार्गावर आले आहेत. त्यामुळे भरधाव  वाहनांचा ताबा सुटून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखभाल-दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीला शर्ती व अटी घालून दिल्या असल्या तरी  त्याचे पालन केले जात नसल्याचे उघड झाले आहे. मेंढवन, धानीवारी, ढेकाळे आणि खानिवडे या तीन घाटांदरम्यान तीव्र  वळणे आहेत. त्यामुळे या भागात अपघाताची शक्यता अधिक आहे. तीव्र वळणे, उड्डाणपुलावरील तीव्र चढ-उतार, दुभाजकांची दुरवस्था झाली आहे, अशी तक्रार काही चालकांनी केली. काही ठिकाणी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टोल सहापदरीकरणाचा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोलनाका येथे सहापदरीकरणाचा टोल वसूल केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात चारोटी, भराड, हलोली, आवढानी येथे चार  पदरी महामार्ग असताना टोल मात्र सहापदरीकरणाचा वसूल केला जात असल्याने वाहतूकदारांत नाराजी आहे.

अपघातांच्या घटना..

राष्ट्रीय महामार्ग ८ वर सन  १९९३ साली मेंढवन येथे ज्वालाग्राही टँकर उलटल्याने ११० आदिवासींचा मृत्यू झाला होता . यांनतर २९ मे  २०१३ रोजी रसायन वाहून नेणारा टँकर आणि लक्झरी बसच्या अपघातात १५ जणांचा मृत्यू तर  ३६ जण  जखमी झाले.  मनोर कुडे येथे  २९ जानेवारी २०१४ रोजी टँकर आणि लक्झरी बस अपघात १४ जण ठार झाले. तलासरी येथे बस अपघातात ११ जण ठार झाले आहेत .

वाडा-भिवंडी रस्ता खचला

वाडा : वाडा-भिवंडी राज्य महामार्गावर आधीच असलेल्या खड्डय़ांमुळे या महामार्गावर प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. हा मार्ग ठिकठिकाणी खचू लागल्याने अपघात वाढ झाली आहे.   मुसळधार पावसाने  मार्ग ठिकठिकाणी खचला आहे. तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सोमवारी या महामार्गावर मुसारणे फाटा येथे प्रवासी वाहतूक करणारे एक वाहन खचलेल्या रस्त्यात अडकले. यात चालक जखमी झाला.

महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. धोकादायक वळणे आहेत. मार्गावर मातीही पसरली जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. ही सारी स्थिती असतानाही ठेकेदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

-हरबन्स सिंग, चारोटी

महामार्गावर मदत क्रमांक, जेसीबी, गस्त, रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातस्थळी त्वरित मदत पोचवली जात आहे. वाहनचालकांची अतिघाई, अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे यामुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत.

-जयंत डांगरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, आयआरबी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 3:47 am

Web Title: landslide threat on mumbai ahmedabad highway zws 70
Next Stories
1 आघाडीबाबत जुलैअखेर निर्णय न झाल्यास स्वतंत्र लढणार -शेट्टी
2 सांगलीत जखमी अवस्थेतील उदमांजर आढळले
3 नवनीत राणा यांनी मेळघाटात केलेली पेरणी वादात?
Just Now!
X