21 September 2020

News Flash

भात पिकावर संकट

खोडकिडी, करप्याचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

खोडकिडी, करप्याचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

पालघर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भात पिकांवर खोडकिडी या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे भात पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. तर डहाणू तालुक्यातील काही भागांमध्ये भात पिकांवर करपा रोग आल्याने तेथील भात पीकही संकटाच्या छायेत आहेत. उभी असलेली भात पिके धोक्यात असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पालघर जिल्हा सुमारे ७५ हजार हेक्टर खरीप लागवडीखालील आहे. भात पिकाच्या हंगामात पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई अशा तालुक्यांमध्ये काही ठिकाणी भात पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने हा प्रादुर्भाव असाच राहिला तर संपूर्ण भातशेतीचे मोठे नुकसान होईल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. कृषी विभागामार्फत क्रॉप सॅप प्रणालीद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून हा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात असल्याचे कृषी विभाग म्हणत असले तरी खोडकिडीला हे वातावरण पोषक असल्याने पुढे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी वेळीच कीड नियंत्रण व्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील ग्रामीण भागात हा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खोडकिडीचे प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे ही कीड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊन इतर भागात पिकांचेही नुकसान करण्याची दाट शक्यता आहे.

या पाश्र्वभूमीवर कृषी विभागाने तात्काळ याचे गांभीर्य लक्षात घेत यावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी समोर येत आहे.

कोणत्या भागांत प्रादुर्भाव?

कोणतीही पीक पद्धती ठरवताना समुद्रकिनाऱ्यावरील अंतर महत्त्वाचे असते. त्यानुसार समुद्रकिनाऱ्यापासून १८ ते २० किलोमीटर अंतरावर खलाती पीक पद्धती आहे. यापासून पुढे १८ ते २० किमी अंतरावर वलाती पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यापुढे असलेल्या अंतरावर घाटमाथा पीक पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये वलाती भागात हा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

भाताच्या रोपांवर असे रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ  नये यासाठी कृषी विभागामार्फत खोडकीड व कीड नियंत्रण व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. असा कोणताही प्रादुर्भाव दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे.

– के. बी तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक.

कीड नियंत्रणासाठी पेरणी वेळीच कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्याचा हा परिणाम उद्भवत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण?

– महेंद्र अधिकारी, अध्यक्ष, पालघर तालुका कृषी खरेदी विक्री संघ

खोडकिडीवर नियंत्रणासाठी उपाययोजना

खोडकिडीवर अगदी कमी खर्चात नियंत्रण आणणे सोपे आहे. यासाठी ‘पक्षी थांबा’ वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एका एकरामध्ये आठ ते दहा लाकडांचे पक्षी थांबे शेतात लावल्यास या थांब्यांवर कोतवाल व वेडा राघू पक्षी येतात. या पक्षांना  खोडकीड सहज दिसत असल्यामुळे ते या किडीला आपले भक्ष्य बनवतात. याचबरोबरीने कामगंध सापळ्यांचाही यासाठी चांगला वापर करता येतो. कामगंध सापळे प्रत्येक एकरमध्ये आठ नग लावता येतात. यामध्ये असलेल्या एका विशिष्ट गंधामुळे नर पतंग सापळ्यात आकर्षित होतो व खोडकिडीचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होते. याचबरोबरीने घरगुती प्रकाश सापळ्याचाही यासाठी वापर करता येईल. या उपायाने खोडकिडी थांबत नसतील तर क्विनॉलफॉस (२ मिली प्रत्येकी एक लिटर पाण्यात) कीटकनाशकांचा वापर करावा. करपा रोगासाठी कार्बनडेंझिम व ट्राय सायक्लेझोल एक ग्राम प्रति एक लिटर पाण्यामध्ये मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी केल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होते, अशी माहिती कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 1:28 am

Web Title: large crisis on paddy crops due to worm larvae zws 70
Next Stories
1 पालघरमध्ये सहा दिवसांची विशेष टाळेबंदी
2 विक्रमगड-मनोर रस्त्याची दैना कायम
3 अकरावी प्रवेशाचे ‘गणित’ किचकट
Just Now!
X