|| चंद्रशेखर बोबडे /अविष्कार देशमुख

औद्योगिक विकासात मागे पडल्यामुळे नागपूरसह विदर्भातील अर्थव्यवस्थेला अलीकडच्या काळात या भागात सुरू झालेल्या पायाभूत सुविधाक्षेत्रासह इतरही क्षेत्रांत सुरू झालेल्या मोठय़ा प्रकल्पांमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगारनिर्मितीमुळे चालना मिळू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

नागपूरमधून देशाच्या चारही भागाला जोडणारी दळणवळण व्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसह कार्गोहबसारखा मोठा प्रकल्प आहे. मात्र असे असतानाही बेरोजगारीची समस्या मोठी होती. त्याचा परिणाम या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेवर दिसून येत होता. पूर्वीच्या सरकारने हे चित्र बदलवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असले तरी त्याने परिस्थितीत बदल घडून आला असे चित्र निर्माण झाले नव्हते. चार वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर नागपूरसह विदर्भाचे औद्योगिक आणि पायाभूत क्षेत्रातील चित्र बदलण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम या भागातील अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दिसू लागला आहे. मेट्रो रेल्वे, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाचे शेकडो किलोमीटरची सिमेंट रस्त्यांच्या कामांसह मिहानमध्ये येऊ घातलेले रिलायन्सचे एअरोस्पेस आणि पतंजली उद्योगसमूहासारखे मोठे उद्योग, एम्स-आयआयएम-ट्रिपल आयटीसारख्या राष्ट्रीय शिक्षण संस्थांमुळे नागपूरसह विदर्भात सर्वच क्षेत्रांतील गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसह त्यांच्याशी निगडित अनेक व्यवसायांत भरभराट होताना दिसून येत आहे.

नऊ हजार कोटींच्या मेट्रोरेल्वे प्रकल्पाच्या निमित्ताने देशविदेशातील या क्षेत्रातील औद्योगिक तंत्रज्ञान शहरात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण संस्थामुळे देशभरातील विद्यार्थी येथे येऊ लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर म्हणून येथे होणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे देश-विदेशातील शिष्टमंडळे, केंद्र व राज्यस्तरावरील अधिकारी यांची वर्दळ शहरात वाढली असून यामुळे हॉटेल इंडस्ट्रिजला बळ मिळाले आहे. एरवी पावसाळ्यात या क्षेत्रात मंदी असते. मात्र सध्या शहरातील सर्व हॉटेल्स फुल्ल झाली आहे. यानिमित्ताने टॅक्सी आणि कॅब व्यवसायालाही चालना मिळाली असून सध्या दोन हजारांपेक्षा अधिक टॅक्सी शहरात धावताना दिसतात. यातून होणारी उलाढाल ही महिन्याला काही कोटींमध्ये आहे.

शहरात मोठी आणि मध्यम स्वरूपाची दोनशेवर हॉटेल्स आणि दोन हजारांवर तेथे खोल्या आहेत. वर्षभर ही हॉटेल्स नागपुरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे बुक असतात. हॉटेल असोसिएशनचे प्रमुख तेजवंदरसिंग यांनीही या बाबीला दुजोरा दिला आहे.

उद्योगक्षेत्रात झालेली वाढ, त्यातून झालेली रोजगारनिर्मिती आणि मोठय़ा प्रकल्पांमुळे येथे स्थलांतरित झालेल्या अधिकारी वर्गामुळे शहरातील वाहनविक्रीही वाढली असून यात चारचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. यामुळे व्हेईकल इंडस्ट्रिजलाही सध्या नागपुरात सुगीचे दिवस आहेत. पेट्रोलची दरवाढ सातत्याने होत असली तरी विक्रीवर कुठलाही परिणाम झाला नाही. दुचाकीची संख्या चौपटीने वाढली आहे.

सध्या नागपूरसह विदर्भात पन्नास हजार कोटींची कामे सुरू असल्याचा दावा सरकारने केला आहे. ही सर्व पायाभूत सुविधेची कामे असून यासाठी लागणारे सिमेंट, लोखंड आणि इतर वस्तूंमुळे मालवाहतूक क्षेत्राला वर्षभरासाठी कामे मिळाली आहेत. हे क्षेत्र मधल्या काळात मंदीच्या गर्तेत सापडले होते हे येथे विशेष. नागपूर हे देशाच्या पर्यटन नकाशावरही महत्त्वाचे स्थळ म्हणून नावारूपास आले आहे. येथून ताडोबा या जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांसह इतरही राष्ट्रीय प्रकल्प जवळ असल्याने देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी नागपूर मध्यवर्ती ठिकाण ठरू लागले आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आहे.

शहरात हॉटेल इंडस्ट्रिजला चालना मिळावी यासाठी सरकारने काही सवलती या क्षेत्रासाठी देणे आवश्यक आहे. सध्या अनेक जाचक अटींचा सामना व्यावसायिक करीत आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. सरकार यातून मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे    – तेजेंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशन, नागपूर