News Flash

वस्त्रोद्योगाला स्मृती इराणींकडून मोठय़ा अपेक्षा

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच इराणी यांचा वस्त्रोद्योगाशी संबंध आला आहे.

संग्रहित छायाचित्र

दयानंद लिपारे, कोल्हापूर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करून वलयांकित बनलेल्या स्मृती इराणी यांच्याकडे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची सूत्रे पुन्हा सोपवण्यात आली आहेत. देशातील सर्वात मोठा उद्योग अशी ओळख असलेल्या वस्त्रोद्योगासमोर अनंत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचे निराकरण करून भारताच्या पारंपरिक वस्त्रोद्योगाला आधुनिकीकरणाच्या मार्गाने गती देण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

शेतीनंतर सर्वाधिक मोठा अशी वस्त्रोद्योगाची ओळख असली तरी हा उद्योग गेली काही वर्षे नानाविध कारणांनी त्रस्त आहे. मंदावलेली निर्यात, प्रशासनातील शैथिल्य, अनुदान मिळण्यातील विलंब, दीर्घकाळाची मंदी, कामगारांचे प्रश्न यामुळे या व्यवसायात मरगळ आली आहे. या पाश्र्वभूमीवर इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योगाचे विरलेले धागे पक्के करण्याचे आणि यातील ‘ताणे-बाणे’ नेटके करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच इराणी यांचा वस्त्रोद्योगाशी संबंध आला आहे. अगदी सुरुवातीला त्यांनी ‘मॉडेलिंग’च्या क्षेत्रात पदार्पण केले होते. या घटकाशी  संपर्क आलेल्या इराणी यांच्याकडे जुलै २०१६ मध्ये वस्त्रोद्योग खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यावेळी त्यांची एकूण कामगिरी संमिश्र स्वरूपाची राहिली. त्यांनी काळाशी सुसंगत अनेक योजना जाहीर केल्या, पण वस्त्रोद्योजकांपर्यंत त्या नीटपणे पोहोचू शकल्या नाहीत. इराणी यांनी वस्त्रोद्योगातील मरगळ दूर सारून चैतन्य आणण्याची मागणी होत आहे.

इराणींनी खोचला पदर!

आपल्यापुढील डोंगराएवढय़ा आव्हानांची जाणीव इराणी यांना अगदी पहिल्याच दिवशी झाली आहे आणि पदर खोचून त्या कामाला लागल्या सुद्धा. ‘नव्या मंत्री स्मृती इराणी यांनी भारताची वस्त्रोद्योग निर्यात वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी ७ जून रोजी नवी दिल्लीत व्यापक बैठक आयोजित केली आहे,’ अशी माहिती पॉवरलूम डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (पीडीक्सएल) अध्यक्ष सुनील पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. निर्यात बाजारपेठ काबीज करण्याचे सरकारचे धोरण आहे. याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले तर भारतीय वस्त्रोद्योगाला निश्चितच ‘अच्छे दिन’  येऊ शकतात, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

इच्छा आहे, दिशा हवी

वस्त्रोद्योगातील ‘टेक्निकल टेक्सटाईल’ हे एकटे क्षेत्रच २०२०—२१ पर्यंत २ लाख कोटी रुपयांची उलाढाल करेल, असा आत्मविश्वास इराणी यांनी नुकताच व्यक्त केला होता. आता हे उद्दिष्ट गाठणे ही त्यांची कसोटी असणार आहे. इराणी यांनी भिवंडी येथे सूत बँकेसह अनेक चांगल्या योजना जाहीर केल्या. दुर्दैवाने त्या उद्योजकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. इराणी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करताना महाराष्ट्र वस्त्रोद्य्ोग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, की साधे माग हा वस्त्रोद्योगातील मुख्य घटक सध्या प्रचंड अडचणीत आहे. साधे माग नीट चालत नाहीत तोवर कापूस, सूतगिरणी, सायझिंग, प्रोसेस ते गारमेंट अशी कोणतीच वस्त्रोद्योग श्रंखला व्यवस्थित कार्यरत राहणार नाही. अत्याधुनिक मागांप्रमाणे साध्या मागाला संरक्षण पुरवावे. ‘इराणी यांच्याकडे इच्छा आहे आता नेमकी दिशा द्यायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:00 am

Web Title: large expectations from smriti irani for textile industry
Next Stories
1 विलीनीकरण केल्यास ‘राष्ट्रवादी’चीच अडचण ; पक्षाने शक्यता फेटाळली
2 चारा छावण्या चालकांच्या दबावापुढे सरकार नमले
3 ‘वैद्यकीय’च्या ५२० जागा वाढविण्याचा प्रस्ताव
Just Now!
X