मोहन अटाळकर

टाळेबंदीच्या एका महिन्यात एकाचा मृत्यू आणि सहा करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या अमरावतीत अवघ्या दहा-बारा दिवसांमध्ये आणखी नऊ मृत्यू आणि करोना रुग्णसंख्या पन्नाशीपार पोहोचल्याने अस्वस्थता पसरली आहे. घाऊक भाजीबाजार, धान्य बाजार बंद करणे, प्रतिबंधित क्षेत्रात अतिरिक्त पोलीस कुमक, महापालिकेतर्फे आरोग्य सर्वेक्षण यासारख्या उपाययोजना करण्यात येऊनही करोनाचा फैलाव रोखण्यात अपयश असल्याचे निदर्शनास येत आहे.

अमरावती शहरात २२ एप्रिलपर्यंत करोनाचा फैलाव झाला नव्हता. हाथीपुरा या पश्चिमेकडील भागात २ एप्रिलला एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो करोनाबाधित असल्याचे ४ तारखेला स्पष्ट झाले. तेव्हाच धोक्याचा इशारा मिळाला होता. प्रशासनाने सामान्य पद्धतीने त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने घेणे, ते प्रयोगशाळेत पाठविणे, वस्तीतील ये-जा प्रतिबंधित करणे, ही प्रक्रिया पार पाडली. पण, या व्यक्तीला करोनाची लागण कुणाकडून झाली, हे अद्यापही हुडकून काढता आलेले नाही. दुसरीकडे, करोना फैलाव होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या भागांत महापालिकेच्या आरोग्य पथकांनाच विरोधाचा सामना करावा लागला. सुरुवातीला लोकांमध्ये गैरसमज होते. ‘एनआरसी’चा विषय त्या वेळी चर्चेत होता. पण, नंतर काही नेत्यांच्या पुढाकाराने लोकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात काहीअंशी यशही आले, पण तोवर वेळ निघून गेली होती.

टाळेबंदीचा पहिला टप्पा १४ एप्रिलला संपला तेव्हा शहरातील हाथीपुरा भागातील एक मृत आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यच करोनाबाधित आढळून आले होते, पण अवघ्या काही दिवसांमध्ये परिस्थिती बदलली. करोनामुळे आतापर्यंत दहा जणांचे मृत्यू झाले आहेत आणि हे सर्व जण करोनाबाधित असल्याचे त्यांच्या मृत्यूपश्चातच स्पष्ट झाले.

हाथीपुरानंतर नुरानी चौक, हैदरपुरा, कमेला ग्राऊंड या भागातूनही करोनाबाधित रुग्ण आढळले. सुरुवातीला अवघ्या तीन ते चार वस्त्यांमध्ये असलेला करोनाचा फैलाव आता शहरातील विविध १८ वस्त्यांमध्ये पोहोचला आहे. रुग्णाच्या संसर्गाचा इतिहास शोधणे आता अवघड बनले आहे.

लोकांची बेपर्वा वृत्ती करोनाच्या फैलावासाठी अनुकूल वातावरण तयार करीत होती. शहरातील घाऊक भाजीबाजारात होणारी प्रचंड गर्दी पाहून सायन्सकोर, दसरा मैदान या ठिकाणी भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, याही ठिकाणी जत्रा भरत होती. अखेरीस भाजीपाला विक्रीच बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. आता संचारबंदीची कडक अंमलबजावणी करून शहरातील इतर भागात करोनाचा फैलाव थांबविणे आणि करोनाची साखळी तोडणे हे आव्हान प्रशासनासमोर आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. स्वत:हून विलगीकरणात राहावे. घराबाहेर पडू नये. सर्वाच्या सहकार्यानेच या महासंकटावर मात करता येईल. प्रादुर्भाव संपूर्णपणे रोखणे अत्यंत आवश्यक आहे. अमरावती जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.