ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता गाडय़ांची संख्या वाढविण्यासंदर्भात ताडोबा व्यवस्थापन गांभीर्याने विचार करत आहे. ताडोबाच्या स्थानिक सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ११७ गाडय़ांऐवजी १५३ गाडय़ा म्हणजेच, ३६ गाडय़ा अतिरिक्त सोडण्याच्या निर्णयावर एकमत झाले असून, तसा आदेश लवकरच निघणार आहे.
पट्टेदार वाघांसाठी केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. ६२५.०४ चौरस कि.मी. क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण प्रकल्प ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात विभागला गेलेला आहे. या प्रकल्पात ४४ पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. पट्टेदार वाघांच्या मुक्त संचारासाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रकल्पाला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत यावर्षी कमालीची वाढ झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांत एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न झाले असून,लाखो र्पयटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. हजारो पर्यटकांना केवळ प्रवेश मिळाला नाही म्हणून निराश होऊन परतावे लागले आहे.
ताडोबाच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक २० मे रोजी झाली. या बैठकीत अधिकारी, तसेच सदस्यांनी पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून गाडय़ांच्या फेऱ्या वाढविण्यावर जोर दिला. ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांनी सदस्यांनी सुचविलेल्या या सूचनांचे स्वागत केले आणि १५३ गाडय़ा नियमित सोडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या ताडोबा प्रकल्पाच्या ताडोबा, मोहुर्ली व कोळसा या तीन परिक्षेत्रात ११७ गाडय़ा नियमित सोडण्यात येतात. यातील १०२ गाडय़ा नियमित बुकिंगच्या माध्यमातून, तर १५ गाडय़ा या विशेषाधिकारातून सोडण्यात येतात. यात मोहुर्ली प्रवेशद्वारातून सर्वाधिक २७ गाडय़ा, खुटवंडा पाच गाडय़ा, नवेगाव पाच, कोलारा प्रवेशद्वारातून नऊ व पांगडी झरी गेटमधून केवळ तीन गाडय़ा नियमित सोडण्यात येतात. बिट्ट सहगल यांचे पुस्तक खरेदी केल्यास अतिविशिष्ट प्रवेशातून पाच गाडय़ांना प्रवेश दिला जातो, तर दहा गाडय़ांचा व्हीआयपी कोटा आहे. आता ही संख्या १५३ पर्यंत नेण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

आज पानवठय़ांवरील व्याघ्र गणना
दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होणारी पानवठय़ांवरील व्याघ्र गणनेला उद्या २५ मे रोजी सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. कोळसा, ताडोबा व मोहुर्ली या तीन वनपरिक्षेत्रातील १५० पानवठय़ांवर चंद्रप्रकाशाच्या साक्षीने ही गणना होणार असून, १५० स्वयंसेवी संस्थेचे सदस्य व १५० वन अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. सलग चोवीस तास ही गणना चालणार आहे.
लवकरच ऑनलाइन बुकिंग
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे बुकिंग लवकरच ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईतील पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग करून प्रवेश मिळवणे सहजशक्य होणार आहे. सध्या ताडोबाचे केवळ २० टक्के जंगल पर्यटकांसाठी खुले आहे. भविष्यात यात वाढ करण्यासंदर्भात ताडोबा व्यवस्थापन सकारात्मक विचार करीत आहे.