News Flash

अभिमानास्पद! महाराष्ट्रात उभारणार कृष्णविवरांचा शोध घेणारी ‘लायगो’ प्रयोगशाळा

ही जगातील केवळ तिसरी आणि अमेरिकेबाहेरची पहिलीच प्रयोगशाळा असणार

LIGO India

हिंगोलीमधील औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा परिसरात लेसर इनफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (LIGO लायगो) हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अशाप्रकारची ही जगातील केवळ तिसरी आणि अमेरिकेबाहेरची पहिलीच प्रयोगशाळा असणार आहे. सध्या केवळ वॉशिंग्टन व लुईझियानामध्ये आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या प्रकल्पासाठी वन विभागाची १२१ हेक्टर जमीन हस्तांतरणास केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे. या प्रकल्पासाठीची जमीन हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या उभारणीतील अडथळा दूर झाला असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य आहे असे अमेरिकी वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

दुघाळा परिसरामध्ये उभारली जाणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रावर उभारली जाणार आहे. यामध्ये १२१ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. अमेरिकेनंतर देशातील ही पहिलीच प्रयोगशाळा आहे. गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत. या ठिकाणी सुमारे चार हेक्टर शासकीय जमीन लिगो प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात आली आहे. ७१ शेतकऱ्यांची सुमारे ४५ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी खरेदी करण्यात येणार आहे. भारतामध्ये उभारली जाणारी ही पहिलीच प्रयोगशाळा असल्यामुळे केंद्र शासनासह राज्य शासनाचे या प्रयोगशाळेच्या उभारणीकडे विशेष लक्ष देत आहे. या प्रयोगात गांधीनगरची प्लाझ्मा संशोधन संस्था, पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिक केंद्र (आयुका), इंदोरचे राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र या संस्थांची भूमिका लायगो इंडिया प्रकल्पात महत्त्वाची ठरणार आहे. लायगो इंडियाचे संपर्क अधिकारी व लायगो हॅनफोर्ड प्रयोगशाळेचे संचालक फ्रेड रॅब यांनी २०१६ मध्ये २०२३ पर्यंत या उपकरणाचे काम भारतात सुरू होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला होता. लेसर इंटरफेरोमीटर या गुरुत्वीय लहरी प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांनी फेब्रुवारीमध्ये गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले.

११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी लायगो (Laser Interfrometer Gravitaional Wave Observatroy)चे कार्यकारी संचालक प्रो. डेविड रिट्झ यांनी गुरुत्त्वीय लहरी सापडल्याची घोषणा केली आणि आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांताला अजून एकदा प्रबळ पुष्टी मिळाली. १९१६ साली आइन्स्टाइन यांची या लहरी अस्तित्त्वात असाव्यात असे भाकीत त्यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या (General Relativiry) सिद्धांताच्या आधारे केले होते. त्याचा भक्कम पुरावा लायगो प्रकल्पामुळे मिळाला आहे. या गुरुत्त्वीय लहरी अतिसूक्ष्म व अतिक्षीण असल्याकारणाने त्यांचा शोध हा अतिशय अवघड, किचकट पण महत्त्वपूर्ण मुद्दा असतो. पण या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या एलएससीच्या (LIGO scientific collaboration) एक हजारांहून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. अभिमानास्पद बाब म्हणजे यामध्ये ६० हून अधिक भारतीयांचा सहभाग होता. गुरुत्वतरंग शोधण्याच्या प्रयत्नांना नव्वदच्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यात अमेरिकेबरोबर इटली, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांचाही सहभाग होता. संयुक्तरीत्या लायगो प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यातून माघार घेतली आणि भारताला आयती संधी मिळाली. भारतीय वैज्ञानिकांनीही त्या संधीचे सोनेच केले. या यशात पुण्यातील ‘आयुका’सह अनेक वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. आता भारतामध्येही लायगो उपकरण बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांना आधीच मिळालेल्या या अनुभवाचा फायदा त्यात नक्कीच होईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

या तंत्रज्ञानाने सर्वात आधी २०१५ मध्ये शोधल्या १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवरच्या गुरुत्वीय लहरींचा पुरावा

वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असलेल्या लायगो प्रयोगशाळांमधून २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रथमच गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा शोधला गेला. त्यावेळी लायगोने पकडलेल्या गुरुत्वीय लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात लायगो प्रयोगशाळांना यश आले होते. दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या या गुरुत्वीय लहरी होत्या. विशेष म्हणजे ही घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती. वॉशिंग्टन व लुईझियाना येथील प्रयोगशाळांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:26 pm

Web Title: laser interferometer gravitational wave observatory to construction in hingoli scsg 91
Next Stories
1 Video : ‘दुर्गामाता दौड’मध्ये उदयनराजेंचा सहभाग
2 मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणं आवश्यक : पंकजा मुंडे
3 शेतकऱ्यांनो भाजपाला दारातही उभं करु नका, शरद पवारांचं आवाहन
Just Now!
X