जम्मू-काश्मीरच्या बलनोई येथे गस्त घालत असताना शनिवारी धारातीर्थी पडलेल्या जवान अक्षयकुमार गोडबोले यांच्या पार्थिवावर सोमवारी येथील धाररस्ता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, महापौर प्रताप देशमुख, आयुक्त अभय महाजन, नगरसेवक शिवाजी भरोसे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी सूर्यवंशी, विजय वाकोडे, प्रा. अरुणकुमार लेमाडे आदींसह मोठा समुदाय उपस्थित होता. अक्षय यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा या वेळी बांध फुटला. उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत. जिल्हाधिकारी सिंह यांनी पुष्पचक्र अर्पण केले. परभणीकरांनी या वेळी अक्षय यांना भावपूर्ण निरोप दिला.
अक्षय हे नेताजी सुभाषचंद्र बोस सनिकी शाळेचे २००४-०५च्या तुकडीचे विद्यार्थी. त्यांचे शालेय शिक्षण या शाळेत झाले. शाळेत सोमवारी शोकसभेचे आयोजन केले होते. प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी अक्षयच्या आठवणी सांगितल्या. विविध शिक्षकांनीही त्याच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. धाररस्ता येथील स्मशानभूमीत नेताजी बोस सनिकी शाळेच्या वतीने शहीद अक्षय यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून शाळेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.