जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत २२ उमेदवार मैदानात आहेत. अंतिम टप्प्यात भाजपचे रावसाहेब दानवे व काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. प्रचार संपत असतानाच्या काळात दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा करताना दिसत आहेत. परंतु त्यापैकी अनेक कार्यकर्त्यांचा तर्क त्यांच्या स्वार्थानुसार आहे!
एकीकडे स्वपक्षातील गट-तट सांभाळत व दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घेत काँग्रेस उमेदवार औताडे यांना प्रचारयंत्रणा राबवावी लागली. राजकारणातील दीर्घ अनुभव पाठीशी असणारे वडील केशवराव औताडे यांचाच अधिक सहभाग नव्या-जुन्या पुढाऱ्यांच्या गाठी-भेटीत राहिला. विलास औताडे तसे नवखे, परंतु मतदारसंघातील आघाडीचे ५ आमदार हे त्यांचे प्रमुख पाठबळ! परंतु त्यासोबतच काही अडचणी व त्या पक्षनिष्ठेऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारणामुळे निर्माण झालेल्या. आपापल्या भागातील प्रचारयंत्रणा स्वत:च्याच ताब्यात राहून मर्जीनुसार राबवावी या साठी आग्रहीच नव्हे, तर हट्टाग्रही असणाऱ्या ठिकठिकाणच्या पुढाऱ्यांशी काँग्रेस उमेदवाराची दररोजची गाठ. त्यामुळे प्रमुख पुढाऱ्यांना नाराज तर करायचे नाही आणि त्यांना नको असणाऱ्या कार्यकर्त्यांना टाळायचे नाही, अशी कसरत उमेदवाराच्या वाटय़ाला आली.
‘माझ्यावर सर्व सोडा, माझ्या भागाचे बघून घेतो’ असे म्हणणारे पुढारी एकीकडे तर दुसरीकडे अशा पुढाऱ्यांना टाळून प्रचारयंत्रणेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची धडपड, हे चित्र स्पष्ट जाणवणारे. आपल्या पक्षातील जे नकोसे वाटतात, त्यांचा प्रचारयंत्रणेशी फारसा संपर्क येऊ नये, या साठी काळजी घेणारी मंडळी काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत उमेदवाराच्या आसपास वावरणारी. अलीकडे तर आपण पक्षाचे कार्यकर्ते, असे सांगण्याऐवजी अमुक नेत्याचे कार्यकर्ते आहोत, हे सांगणारी नेतेमंडळीही वाढली. उमेदवारासंदर्भात पक्षाऐवजी नात्या-गोत्याचीच चर्चा अधिक. या सर्व बाबींमुळे ‘माणूस मोठा, पक्ष छोटा’ झाल्याची चर्चा मात्र सर्वत्र ऐकू येणारी.
भाजपचे उमेदवार दानवे अनुभवी असून त्यांना या वेळेस ‘मोदी लाट’ तारून नेईल, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास. मात्र, काँग्रेसमध्ये मतदारसंघात दानवेंविरुद्ध लाट असल्याची चर्चा. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचे समर्थक वैयक्तिकरीत्या दानवे यांच्यावर गैरकारभाराचे आरोप करीत राहिले. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आता भाजपच्या प्रचारात दिसत असले, तरी त्यांच्या नाराजीची चर्चाच अधिक झाली. काँग्रेस उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत तर एका आमदाराने ‘अंदर की बात है, नाना हमारे साथ है’ असा अप्रत्यक्षरीत्या बागडेंचा उल्लेख करून नाराच लगावला.
औताडे निवडून आल्यास जालना जिल्हा काँग्रेसवर औरंगाबादचे अधिपत्य तर राहणार नाही ना, अशी काहीजणांना शंका पडली. दुसरीकडे दानवे पराभूत झाले, तर भोकरदन विधानसभेसाठी उभे राहतील आणि मग तेथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चंद्रकांत दानवे यांचे काही खरे नाही, अशीही चर्चा!
दानवे व औताडे या दोन्ही उमेदवारांच्या संपर्कात राहण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा अर्थकारणाशी जोडलेल्यांची धडपड मात्र अधिक. यापूर्वी व्यावसायिक लाभ घेतलेले व भविष्यातही आपले अर्थकारण चालू राहावे, या उद्देशाने दोन्ही उमेदवारांच्या सभोवताली गर्दी करणारे कार्यकर्ते ठळक नजरेत भरणारे. दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांशी बोलल्यावर एक बाब समोर येते ती म्हणजे ‘एकाची परिस्थिती चांगली, परंतु दुसऱ्याची मात्र वाईट नाही’. यात अनेक कार्यकर्ते मात्र छातीठोकपणे आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असे सांगणारे. परंतु ‘जसा ज्याचा स्वार्थ, तसा त्याचा तर्क’ या उक्तीत बसणारे हे कार्यकर्ते आपल्या सोयीनुसार बोलत आहेत, हे लपून न राहणारे!
दोन्ही उमेदवारांचे काही जाणकार आणि व्यावसायिक समर्थक सावध बोलणारे किंवा गप्प बसणारे. दोन्ही पक्षांतील अनेक स्थानिक पुढाऱ्यांचे एकमेकांमध्ये गुंतलेले आर्थिक हितसंबंध माहीत असणारा हा वर्ग. राजकारणाची जागा अर्थकारण घेते, तेव्हा पक्षीय भिंती गळून पडतात, याची उदाहरणे माहीत असणारा. त्यामुळे एका उमेदवाराच्या पाठीशी राहताना प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा त्यांच्या प्रभावशाली पाठीराख्यांशी किमान वाईट संबंध प्रस्थापित होऊ नये याची काळजी घेणारा हा वर्ग. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी या मतदारसंघातील प्रचार संपत असून २४ एप्रिलला मतदान होणार आहे.