प्रादेशिक सेना भरतीसाठी देवळाली छावणी मंडळ परिसरात आलेल्या हजारो युवकांवर मंगळवारी लष्करी जवानांनी लाठीमार केल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन कित्येक जण जखमी झाले. यावेळी शेकडोंना आपले साहित्य व चप्पल-बूट तिथेच सोडून पळ काढावा लागल्याने परिसरात त्याचा खच पडला होता. भरतीसाठी आलेल्या युवकांची अशीच गर्दी रेल्वेस्थानक परिसरात होती. या ठिकाणी रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाला.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या प्रादेशिक सेना भरतीसाठी जवळपास सहा ते सात राज्यातून हजारो तरूण परीक्षेच्या पूर्वसंध्येला देवळाली कॅम्प येथे दाखल झाले. जवळपास २० ते २५ हजार तरूण एकाचवेळी आल्यामुळे रेल्वे स्थानक, छावणी मंडळाचा परिसर एकदम गजबजून गेला. या परिसरात निवासाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पाच ते सात हजार जणांनी रेल्वे स्थानकावर आसरा घेतला. या गर्दीत भरतीसाठी वाशिमहून आलेला बुद्धभूषण सिद्धार्थ पाटोळे हा रेल्वेखाली जागीच ठार झाला. निवासाप्रमाणे भरती प्रक्रियेचे कोणतेही नियोजन नव्हते. त्याचा फटका तरुणांना सहन करावा लागला. या दिवशी दहावी उत्तीर्ण अर्हता असणाऱ्यांची ४० जागांसाठी शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा होणार होती. टेंपल हिल परिसरात पहाटेपासून तरूण मार्गक्रमण करू लागले. यावेळी समोरील रस्त्यावरून जाण्यास काही लष्करी कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेऊन त्यांना पिटाळणे सुरू केले. लाठीमार झाल्याने हे तरूण मागे पळत असताना मागून तसाच जथा पुढे येत होता. परिणामी, एकच गोंधळ उडून सर्वत्र धावपळ सुरू झाली. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. चप्पल, बूट व जवळचे साहित्य सोडून अनेकांनी पळ काढला. अनेकांचे भ्रमणध्वनी हरविले. जवळपास २० ते २५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर लष्कराने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केला. या घटनेत किती तरूण जखमी झाले त्याबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पुढील पाच दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे गर्दी उत्तरोत्तर वाढत जाणार असताना लष्कराने त्या दृष्टीने कोणतेही नियोजन केले नसल्याचे दिसून आले.

उपाशी पोटी परीक्षा
भरतीवेळी झालेला लाठीमार आणि जवळचे साहित्य हरवल्याने भयभीत होऊन अनेकांनी माघारीचा रस्ता पकडला. जे कसेबसे परीक्षेसाठी थांबले, त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची तसदी यंत्रणेने घेतली नाही. लष्करी परिसरात जवळपास कुठे भोजनाची व्यवस्था नसल्याने अनेकांना दिवसभर उपाशी राहून शारीरिक क्षमतेची परीक्षा द्यावी लागली.