आठ कार्यकर्ते जखमी, माजी आमदार चटप यांच्यासह शेकडोंना अटक; स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवादी संघटनांनी १ मे या महाराष्ट्र दिनी ‘काळा दिवस’ पाळला. त्याचवेळी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकावण्यासाठी निघालेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ‘विदर्भ मार्च’वर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात आठ कार्यकर्ते जखमी झाले. शेकडो आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अ‍ॅड. नंदा पराते या प्रमुख नेत्यांचा समावेश होता.

विदर्भवादी संघटनांनी महाराष्ट्र दिनाला विरोध करीत हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे जाहीर केले होते व नागपूरच्या विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकावण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार विधानभवनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात १४ संघटनांचा एकत्रित मोर्चा मंगळवारी यशवंत स्टेडियम येथून दुपारी एक वाजता निघाला.  झाशी राणी चौक, सीताबर्डी, लोखंडी पूल, जयस्तंभ चौक, परवाना भवन चौक मार्गे विधानभवनाकडे जात असताना श्रीमोहिमी कॉम्प्लेक्ससमोर पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी मोर्चेकरी व पोलीस यांच्यात वादावादी झाली. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले कठडे बाजूला सारून विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात अचलपूरच्या रवि वानखेडे यांचे डोके फुटले. याशिवाय बबलू वानखेडे, मुकेश मासुरकर, सौरभ सिरसाट, साजीद मिस्त्री आदी कार्यकर्ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नंदा पराते, प्रबीर चक्रवर्ती, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते, रंजना मामर्डे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, शहराध्यक्ष राजू नागुलवार या प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. सायंकाळच्या सुमारास सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

अ‍ॅड. अणे यांनी विदर्भ ध्वज फडकावला

‘विदर्भ कनेक्ट’ (व्हीकॅन) या संघटनेतर्फे बजाजनगरातील ‘विष्णू की रसोई’मध्ये आयोजित एका कार्यक्रमात १ मे रोजी ज्येष्ठ विधिज्ञ आणि कट्टर विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या हस्ते विदर्भाचा ध्वज फडकावण्यात आला. यावेळी  संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, माजी न्या. विकास सिरपूरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, अ‍ॅड. निरज खांदेवाले, दिनेश नायडू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, संजय सिंगलकर आदी विदर्भवादी नेते आणि समर्थक उपस्थित होते.

‘‘विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकावण्यासाठी हा मोर्चा होता. मात्र, सरकारने पोलिसांच्या मदतीने त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. विदर्भाचे वेगळे राज्य देण्याची धमक मोदी, गडकरी आणि फडणवीस यांच्यात नाही. भाजपने विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही. आगामी निवडणुकीत जनता त्यांना सत्तेतून पायउतार करेल. पोलिसांच्या लाठीहल्ल्याबाबत आम्ही मानवाधिकार आयोगाला कळवू.’’     – अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार