आठवडय़ानंतरच पाणीपुरवठा सुरळीत

‘आधीच उल्हास आणि त्यात फाल्गून मास’ अशी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ाची स्थिती झाली असून त्यामुळे सोलापूरकरांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणावरील पाणी उपसा करणारे दोन विजेची जनित्रे जळाल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. परंतु सुखद धक्का देणारी बाब म्हणजे तीव्र पाणीटंचाईचे संकट झेलणाऱ्या लातूर महापालिकेने मदतीचा हात दिल्यामुळे दोन दिवसानंतर लातूर येथून आलेले जनित्र बसविण्यात आल्यानंतर पाणी उपसा सुरू झाला खरा; परंतु शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उजनी धरण ते थेट सोलापूर पाईपलाईन पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी पंपगृहाला वीजपुरवठा करणारे दोन्ही जनित्रे अचानकपणे जळाल्यामुळे तेथील पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाली आहे. अगोदरच शहराचा पाणीपुरवठा चार ते पाच दिवसाआड होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच आता उजनी धरणावरील  पंपगृहातील जनित्रे बंद पडल्यामुळे शहरावरील पाण्याचे संकट नागरिकांची चिंता वाढविणारे ठरले आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची चिन्हे होती.

दरम्यान, सोलापूर महापालिकेने युध्दपातळीवर प्रयत्न हाती घेताना सुदैवाने लातूर महापालिका धावून आली आहे. लातर महापालिकेने स्वत:चे एक जनित्र सोलापूर महापालिकेला उपलब्ध करून दिले आहे. हे जनित्र उजनी धरणावरील पंपगृहात बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम शनिवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर लगेचच दुबार उपसा करून पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे पालिका प्रशासनाचा जीव भांडय़ात पडला, तर सोलापूरकरांनीही समाधानाचा सुस्कारा सोडला असला तरी प्रत्यक्षात शहराचा पाणीपुरवठा अद्यापि सुरळीत झाला नाही. त्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उजनी धरण-सोलापूर थेट पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाणीपुरवठा होण्यास विलंब होत आहे. शहरातील गावठाण भागात भवानी पेठ (पाणी गिरणी) पाणी शुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा उशिराने सुरू झाला आहे. सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना तो सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.