लातूर जिल्हय़ात संध्याकाळी पाचपर्यंत सरासरी ६०.७२ टक्के मतदान झाले. औसा ६२.१९, निलंगा ६६.१८, अहमदपूर ६६.६१, उदगीर ५५, लातूर शहर ५८.६, तर लातूर ग्रामीण मतदारसंघात ५६.३२ टक्के मतदान झाले होते.
औसा मतदारसंघातील कासारशिरसी, होसूर, रामिलग मुदगड, औसा, भुतमुगळी, अहमदपूर मतदारसंघातील वडवळ नागनाथ आदी गावांत पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे मतदानात काहीसा व्यत्यय आला. पावसामुळे सुमारे अर्धा तास मतदानाचा खोळंबा झाला. मतदान केंद्रांतून मतदारांना बाहेर पडता येत नव्हते, तर घरातून मतदानासाठी जाणेही अवघड झाले होते. मागील निवडणुकीत जिल्हय़ात १५ लाख ८६ हजार ३७० मतदारसंख्या होती, आता यात भर पडून ही संख्या १७ लाख १३ हजार ९२३ झाली. सकाळी ७ वाजता विविध केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. पहिल्या ५ मतदारांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्याचे आला. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदान चांगले झाले.
लातूर शहर मतदारसंघात सकाळी ७ ते ९ या वेळेत ६.६०, लातूर ग्रामीणमध्ये ८, अहमदपूर ७.७२, उदगीर ७.५६, निलंगा ७.९१, तर औसा मतदारसंघात ११.५३ टक्के मतदान झाले. ९ ते ११ या वेळेत मतदानाने चांगली गती घेतली. लातूर शहर मतदारसंघात २१.१८, ग्रामीण मतदारसंघात २२.०४, अहमदपूर १५.१०, उदगीर १३.१२, निलंगा २३.१४, तर औसा मतदारसंघात २४.०२ टक्के मतदान झाले. अकरापर्यंत जिल्हय़ात सरासरी १८.५० टक्के मतदान झाले.
दुपारी एकपर्यंत जिल्हय़ात सरासरी ३८ टक्के मतदान झाले. लातूर ग्रामीण ३४.९३, लातूर शहर ३७.३९, अहमदपूर ३७.०६, उदगीर ३८.५५, निलंगा ३७.१६, तर औसा मतदारसंघात ४२.०८ टक्के मतदान झाले. औसा मतदारसंघात सकाळपासूनच सर्वाधिक मतदान होते. प्रत्येक दोन तासांत औसा मतदारसंघातच सर्वाधिक मतदान झाले.
दुपारी तीनपर्यंत जिल्हय़ात सरासरी ४९.३२ टक्के मतदान झाले. लातूर ग्रामीण ४४.४५ टक्के, यात पुरुषांचे मतदान ४५.८९, तर महिलांचे मतदान ४२.८१ टक्के झाले. लातूर शहर मतदारसंघात ४७.७० टक्के मतदान झाले, यात पुरुषांचे मतदान ४८.१२, तर महिलांचे मतदान ४७.२२ टक्के, अहमदपूर मतदारसंघात ५३.०४ टक्के, यात पुरुषांचे ५४.३६ व महिलांचे ५१.५३ टक्के, उदगीर ४४.७१ टक्के, यात पुरुषांचे प्रमाण ५२.२७, तर महिलांचे ३६.०१, निलंगा मतदारसंघात ५१.७० टक्के मतदान झाले. यात पुरुषांचे मतदान ५२.९९ व महिलांचे ५०.२३ टक्के होते. औसा मतदारसंघात ५४.९९ टक्के, यात पुरुषांचे ५७.०२ व महिलांचे मतदान ५२.६४ टक्के झाले. जिल्हय़ात पुरुषांचे मतदान सरासरी ५१.५८, तर महिलांचे मतदान ४६.७४ टक्के झाले.
क्षणचित्रे
संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही
जिल्हय़ातील २३ संवेदनशील मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत घडणाऱ्या घटनांची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना कळावी, या साठी गुगल वेबकास्ट वापरून व्हिडिओ शूटिंग केले जात होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना कक्षात बसून संवेदनशील केंद्रांवर लक्ष देणे सोपे झाले.
मतदार जागृतीसाठी एसएमएस सेवा
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या पुढाकाराने मतदार जागृतीसाठी मतदानाच्या दिवशी दिवसभर एसएमएस पाठवले जात होते. सकाळी सातपूर्वीच मतदारांना मतदानाची आठवण करणारा पहिला एसएमएस आला. त्यानंतर दुपारी १ वाजता आपण मतदान केले का? सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ असल्यामुळे वेळ काढा व मतदान करा, असे आवाहन करणारा एसएमएस मतदारांना पोहोचला.
मतदान केंद्रापर्यंत बिनपशाची वाहनव्यवस्था
जिल्हाभर मतदानाची सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली. मतदान केंद्राबाहेर प्रमुख पक्षांनी मतदारांना मदत करण्यासाठी केंद्र उभारले होते. निवडणूक आयोगातर्फे पोलचीटचे वाटप घरोघरी करण्यात आले होते. मात्र, ज्यांच्या घरापर्यंत पोहोचता आले नाही, त्यांची अडचण होऊ नये म्हणून प्रत्येक केंद्रावर आयोगातर्फे पोलचीटची व्यवस्था केली होती. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी जणू काही आयोगानेच व्यवस्था केली आहे काय? असा भास व्हावा, असे वातावरण होते. शहरातील अनेक गल्लीत ऑटोरिक्षा उभ्या होत्या. त्यात मतदार बसत व ज्या केंद्रापर्यंत त्यांना जायचे आहे, त्याचे नाव सांगत. साधारणपणे रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षावाला प्रवाशांना पसे मागतो. मात्र, मतदान दिवशी नेमके काय गौडबंगाल होते, ते कळले नाही. कोणताही रिक्षेवाला प्रवाशांशी पशासाठी हुज्जत घालत नव्हता. मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर पुन्हा घरापर्यंत पोहोचण्यासाठीही रिक्षांची व्यवस्था होती. रिक्षाचा खर्च नेमका कोण करत होते, याचा पत्ता मात्र लागत नव्हता.
अफवांचे पेव
मतदानाच्या दिवशी विविध मतदारसंघांत उमेदवाराला मारहाण झाली, पसे पकडले, कार्यकर्त्यांना कोंडून ठेवले, मतदारांनी उमेदवाराला डांबून ठेवले यासारख्या अफवा जाणूनबुजून पसरवल्या जात होत्या. मात्र, जिल्हय़ात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.