News Flash

जवखेडा निषेध मोर्चात हुल्लडबाजांची दगडफेक

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी येथे निघालेल्या विविध पक्ष, संघटनांच्या मोर्चाला हुल्लडबाजांकडून दगडफेकीने हिंसक वळण मिळाले.

| November 2, 2014 01:56 am

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी येथे निघालेल्या विविध पक्ष, संघटनांच्या मोर्चाला हुल्लडबाजांकडून दगडफेकीने हिंसक वळण मिळाले. मोर्चातील लोकांनीच सुमारे अर्धा-पाऊण तास मोठय़ा प्रमाणात केलेल्या दगडफेकीत सुमारे तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या काचांचा व दगडांचा खच पडला होता. काही शोरूमसह दुकानांचेही यात मोठे नुकसान झाले. दिसली काच की मार दगड असाच मोर्चेक ऱ्यांचा पवित्रा होता. मोर्चाच्या वेळी दुकाने बंद होती. मात्र, बंद दुकानांच्या काचा दगड भिरकावून, तसेच या वेळी अनेक वाहनांच्या काचाही फोडल्या. दरम्यान, दगडफेकीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, या प्रकरणी गुन्हे दाखल करून संबंधितांना अटक करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले.
रिपाइंचे आठवले व गवई गट, पीपल्स डेमोक्रॅटिकसह भारिप-बहुजन महासंघ, बसप व इतर पक्षांचे नेते-कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. टाऊन हॉल मदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असे सुमारे ५ किलोमीटर अंतर मोच्रेकऱ्यांना कापायचे होते. दुपारी साडेबारा वाजता मोर्चा निघाला. मात्र, मोर्चाच्या वेळी हातगाडेवाले, फेरीवाले यांच्यावर मोच्रेकरी ओरडत होते. मोर्चात तरुणांची संख्या लक्षणीय होती. शिवाजी चौकानंतर मात्र मोर्चाला हिंसक वळण लागले. दुकान वा इमारतीला काच दिसली, की दगड भिरकावलाच असे चित्र दिसू लागले.
रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवरही मोर्चेक ऱ्यांनी दगडफेक केली. यशवंत नागरी सहकारी बँक, विश्वसुपर मार्केट, सहय़ाद्री हॉटेल, साई इंटरनॅशनल लॉज, महेंद्रा शोरूम, हुंदाई शोरूमसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल ग्रँडच्या काचा फोडण्यात आल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काचांचा मोठा खच पडल्याचे दृश्य हेते. एखाद्या भागात दंगल घडल्यानंतर दिसावे, असे दृश्य ३ किलोमीटर अंतरापर्यंत पाहावयास मिळत होते. काचांचा खच व दगडांचा ढीग हे चित्र ठळकपणे दिसून येत होते. मोच्रेकऱ्यांनी टेम्पो व पोत्यांत भरून दगड आणले होते, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते. बंदोबस्तास आलेल्या पोलिसांनी मात्र कमी संख्याबळामुळे मोच्रेकऱ्यांना आवर न घालता शांत राहणेच पसंत केले.
दरम्यान, दगडफेकीमुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान मोर्चाच्या संयोजकांनी भरून द्यावे, अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे सचिव दिनेश गिल्डा यांनी केली. बार्शी रस्त्यावर उभ्या केलेल्या गिल्डा यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या.
‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
जवखेडे हत्याकांडाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी लातूर ‘बंद’चे आयोजन केले होते. ‘बंद’ला लातूरकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.
विवेकानंद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, राजीव गांधी ते रेणापूर नाका परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. काही ठिकाणी वृत्तपत्र कार्यालय, औषध दुकाने उघडी होती. दगडफेकीमुळे अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या. फेरीवाल्यांनीही काढता पाय घेतला. विविध पक्ष, संघटनांच्या मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय होती. निळे झेंडे फडकावत तरुणांनी लक्ष वेधून घेतले. हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करावी व दलितांना संरक्षण दिले जावे आदी मागण्यांचे निवेदन मोच्रेकऱ्यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 1:56 am

Web Title: latur closed spontaneous response
Next Stories
1 दुसऱ्याची कागदपत्रे वापरून मोबाईल सीमकार्डची विक्री!
2 तुळजाभवानी अभियांत्रिकीतील ५ प्राध्यापक, कर्मचारी निलंबित
3 मराठवाडय़ाच्या पाण्याबाबत राष्ट्रवादीकडून आखडता हात!
Just Now!
X