पानगावमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना चौकीत जमावाची मारहाण

शिवजयंतीनिमित्त मध्यरात्री भगवे झेंडे लावण्यास हरकत घेतल्याचे पर्यवसान सुमारे २०० ते २५० जणांच्या जमावाने सकाळी पोलीस चौकीवर चाल करून जाण्यात झाले. या वेळी हल्ला चढवून दोघा पोलिसांना बेदम मारहाण करण्यात झाली. यातील एका मुस्लीम पोलीस अधिकाऱ्याच्या हातात भगवा झेंडा देऊन चौकीतून मारहाण करीत करीत जेथे झेंडा लावण्यास पोलिसांनी हरकत घेतली होती, तेथपर्यंत ओढत नेले व त्याच्या हातानेच झेंडा रोवून ‘जय भवानी जय शिवराय’ घोषणा देण्यास भाग पाडले.. लातूर तालुक्यातील पानगाव येथे हा प्रकार घडला. मात्र, चार दिवसांनंतरही या गावातील वातावरण तणावपूर्ण असून गावात सध्या २५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. याप्रकरणी १२५ जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यातील १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

पानगाव येथे चौकात मध्यरात्री झेंडे लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटकले व या ठिकाणी झेंडे लावून नसता वाद निर्माण करू नका, असे समजावले. तेव्हा कार्यकत्रे तेथून निघून गेले व पोलीसही चौकीत परतले. मात्र भगवे झेंडे लावू देण्यास पोलिसांनी विरोध केला, याचा राग काहींच्या मनात होता, त्यातूनच गावात पोलिसांविरोधात अफवा पसरवल्या गेल्या. सकाळी साडेआठच्या सुमारास गावातील दुकाने बंद करीत जमाव एकत्र जमू लागला. हा जमाव पोलीस चौकीवर चाल करून गेला. बाहेर उभे असणाऱ्या पोलीस नाईक आर. एल. आवस्कर यांना जमावाने बेदम मारहाण केली. स्वतचा जीव वाचवण्यासाठी आवस्कर तिथून निघून गेले. मात्र जमाव चौकीत घुसला व चौकीतील फíनचर, कागदपत्रांची नासधूस सुरू केली. सहायक पोलीस निरीक्षक युनूस शेख या वेळी आत बसले होते. जमावाने त्यांना बेदम मारहाण सुरू केली. त्यांच्या हातात भगवे झेंडे देऊन पोलीस ठाण्यापासून ज्या ठिकाणी झेंडा लावण्यास रात्री मनाई केली होती, तेथपर्यंत त्यांना रस्त्यावरून मारहाण करीत नेण्यात आले. जवळच्या रेणापूर पोलीस चौकीला याचे वृत्त कळवण्यात आले होते. त्यानंतर पोलीस व महसूल विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पानगावला भेट दिली.

गेल्या १० वर्षांत या गावातील मंडळींनी वेगवेगळ्या कारणांमुळे यापूर्वी दोन वेळा पोलीस चौकीवर हल्ला चढवून पोलिसांना मारहाण केली होती. सोमवारी पानगावला भेट दिली तेव्हा फारसे कोणी उघडपणे बोलायला तयार नव्हते. गणेश वांगे या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने घडलेल्या घटनेमुळे गावाला गालबोट लागले असून याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी, अशी भावना व्यक्त केली.

एमआयएमचे राजकारण!

पानगाव घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरातील गांधी चौकात एमआयएमच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.