News Flash

भाजपच्या आशा पल्लवीत; काँग्रेस सावध

सध्याच्या जिल्हा परिषदेत ५८ सदस्यांपकी ३५ सदस्या एकटय़ा काँग्रेसचे आहेत.

 

लातूर जिल्हा परिषद निवडणूक

नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच, गेली अनेक वर्षे पारंपरिक बालेकिल्ल्यात फटका बसल्याने काँग्रेसचे नेते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसची पीछेहाट होत असताना ती जागा भरून काढता येईल का, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर भाजपकडून कशी सन्मानाची वागणूक मिळते या प्रतीक्षेत शिवसेना आहे.

लातूर जिल्हा परिषदेत स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता आहे. काही वेळा राजकीय परिस्थितीमुळे विरोधकांचे केवळ संख्याबळ वाढले, मात्र त्यांना सत्तेचा सोपान गाठता आला नाही. सध्याच्या जिल्हा परिषदेत ५८ सदस्यांपकी ३५ सदस्या एकटय़ा काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, भाजप आठ व शिवसेनेचे सहा सदस्य आहेत. जिल्हय़ातील दहा पंचायत समितींपकी दोन पंचायत समितीचे सभापती भाजपचे तर दोन राष्ट्रवादीचे व उर्वरीत सहा ठिकाणी काँग्रेसचे सभापती आहेत. देशात व राज्यात भाजपची सत्ता, नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने दिलेला कौल पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्तास्थापनेसाठी भाजपची मंडळी वेगवेगळ्या व्यूहरचना आखत आहेत. पालिका निवडणुकीत आपापसातील गट बाजूला ठेवून सर्वानी एकदिलाने काम केल्यामुळे भाजपला यश मिळाले. याच पद्धतीने आगामी निवडणुकीत एकदिलाने काम झाले तर भाजपची सत्ता येऊ शकते अशी भूमिका मांडत पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील हे सर्व गटातटाची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

सेनेशी जुळवून घेण्याचे प्रयत्न

नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती झाली नाही त्यामुळे काही ठिकाणी अकारण पराभावाला सामोरे जावे लागले हे लक्षात घेऊन या निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्याची भूमिका तत्त्वत: मांडली आहे. शिवसेनेची नेतेमंडळी भाजपचे नेते युती करण्यात तात्त्विक व व्यावहारिक या दोन्ही भूमिकेत किती तफावत ठेवतात याकडे लक्ष ठेवून आहेत. केवळ चच्रेत गुंतवून ठेवत ऐन वेळी निर्णय रेटले जाणार असतील तर शिवसेना सवतासुभा मांडण्याच्या मन:स्थितीत आहे. अहमदपूरचे आमदार विनायक पाटील यांनी आपल्या दोन तालुक्यांपुरते स्वबळाची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपूर व औसा या दोन तालुक्यांत संघटनात्मक काम चांगले आहे. या दोन तालुक्यांत प्रामुख्याने राष्ट्रवादीने जोर लावला असून उर्वरीत ठिकाणी क्षमतेनुसार निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने आघाडीची तयारी दाखवली तर राष्ट्रवादी चर्चा करायला तयार आहे, मात्र राष्ट्रवादीच्या क्षमतेनुसार जागा देऊ केल्या तरच आघाडी होईल अन्यथा स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहेच.

काँग्रेसची स्थिती या वेळी अडचणीची आहे. निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, उदगीर, जळकोट हा परिसर काँग्रेससाठी दुष्काळाचा मानला जातो आहे. अहमदपुरात काँग्रेसची स्थिती बेतासबात आहे. काँग्रेसची ताकद फक्त लातूर ग्रामीण व औसा, चाकूर तालुक्यात आहे. औसा तालुक्यात शिवसेनेचे दिनकर माने यांनी निवडणुकीत सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. याचा फटका अन्य पक्षांना बसू शकतो. नगरपालिका निवडणुकीत औसा पालिकेत काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे आमदार बसवराज पाटील हेही अडचणीत आहेत. जिल्हाभरात मान्य होईल असे नेतृत्व म्हणून आमदार दिलीपराव देशमुख यांच्याकडे बघितले जाते. ते या निवडणुकीत किती वेळ देणार? किती ठिकाणी बठका घेणार? यावर काँग्रेसचे भवितव्य आहे. अमित देशमुख, त्र्यंबक भिसे व बसवराज पाटील हे तीन आमदार असले तरी तिघांनाही संपूर्ण जिल्हय़ात प्रचाराला मर्यादा आहेत. लातूर ग्रामीणमध्ये माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर आपला गट मजबुतीसाठी प्रयत्न करतील. त्यांच्या संघर्षांचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील जि.प.च्या अध्यक्षा आहेत. त्या पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

नगरपालिका निवडणुकीत नोटाबंदीचा विषय उपयोगी पडला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ग्रामीण भागातील निवडणुकीत तो फायदेशीर ठरेल, अशी काँग्रेसच्या मंडळींना अपेक्षा आहे. भाजपची सारी मदार ही नेहमीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व स्व. विलासराव देशमुख यांनी केलेले काम एका बाजूला तर दुसरीकडे मानव विकास निर्देशांकात राज्यात जिल्हय़ाचा खालून चौथा क्रमांक असल्याचे शल्य आपल्याला आहे व खरा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा मुद्दा मांडत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 1:21 am

Web Title: latur district council election
Next Stories
1 साखर कारखान्याच्या साडेआठ हजार कोटींच्या कर्जाच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव
2 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायमची तुटण्याच्या बेतात
3 नोटाबंदीची झळ शेतक ऱ्यांना नव्हे, तर काळ्या पैशावर चालणाऱ्या मीडियालाच
Just Now!
X