|| प्रदीप नणंदकर

लातूर : लातूर शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित आहे. आठवडय़ातून एकदा पाणी मिळाले तरी शहरवासीयांसाठी ती चन असते. २०१६ साली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणातील पाणी संपल्याने शहरवासीयांना मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. जगात सर्वाधिक काळ एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावे लागण्यात लातूरची नोंद झाली.

२०१९ साली पावसाळय़ात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. ऑक्टोबर महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल अशी स्थिती होती. पहिल्यांदा लातुरातील सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाणी नसल्याने लोकांना मूर्ती तशाच ठेवण्याचे आवाहन केले गेले व त्याला लातूरकरांनी प्रतिसादही दिला. पाण्याची गंभीर समस्या होती. सुदैवाने परतीच्या मान्सूनचा पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी ते केवळ आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखेच आहे.

दुष्काळी भाग असल्याने हमखास पाण्याचा स्रोत नाही. मांजरा नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत व त्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा अध्यादेश असला तरी तसेच प्रत्यक्षात कृतीत उतरत नाही. उजनी धरणातील पाणी धनेगाव धरणात आणले व अडचणीच्या काळात ते वापरणे हा पर्याय आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक या मुद्यावर गाजली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात हा प्रमुख मुद्दा होता. आमदार अमित देशमुख यांनी जर राज्यात आमचे सरकार आले तर एक महिन्यात उजनीचे पाणी लातूरकरांना मिळेल असे आश्वासन दिले होते. सुदैवाने राज्याच्या मंत्रिमंडळात अमित देशमुख कॅबिनेटमंत्री आहेत. लातूर शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याची संधी त्यांना आहे. गतीने त्यांनी हे काम करावे ही रास्त अपेक्षा लातूरकरांची आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मराठवाडय़ात येत आहेत. उजनीच्या पाण्याचा प्रश्न विलासराव देशमुखांच्या काळापासून लोंबकळत पडला आहे. त्यांचे पुत्र अमित देशमुख मंत्रिमंडळात असताना हा प्रश्न सोडवण्याची संधी आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून सीना-कोळेगाव माग्रे धनेगाव धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी आíथक तरतूद करावी, अशी लातूरकरांची मागणी असल्याचे कार्यकत्रे मनोहरराव गोमारे म्हणाले.