विलासराव देशमुख व शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांनी मुख्यमंत्रीपद, तर शिवराज पाटील यांनी केंद्रात गृहसह महत्त्वाची खाती भूषवूनही लातूरच्या विकासाला वेग आला नाही. पण केंद्र व राज्यात सत्ताबदल झाल्यावर लातूरकरांचे नशीब पालटले. विविध विकास कामे सुरू झाली. रेल्वे बोगी प्रकल्पाची अर्थसंकल्पात घोषणा झाली आणि दोन महिन्यांत त्यांचे प्रत्यक्ष भूमिपूजनही झाले. त्यामुळे लातूर जिल्हा मराठवाडय़ाचा विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश हाती घेऊन ७० वष्रे पुरी होत असली तरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्यात अजूनही यश आले नाही. मराठवाडा, विदर्भ विकासापासून अजूनही वंचित राहिले होते. मराठवाडय़ात औरंगाबाद नांदेड वगळता उर्वरित शहराची दखलही घेतली जात नसे. औद्योगिक चेहरा काही प्रमाणात औरंगाबादला. उर्वरित ठिकाणी तोही नाही. लातूरची ओळख दहावी, बारावीच्या निकालातील यशामुळे देशभर झाली, मात्र या शहराचा औद्योगिक चेहरा अशी ओळख निर्माण होऊ शकते याचा विचारही कोणी केला नाही. विलासराव देशमुख, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर हे मातब्बर नेते. काँग्रेसचा गड म्हणून लातूरचे नाव देशाच्या नकाशावर होते, मात्र या भागाच्या सर्वागीण विकासासाठी या मंडळींचे प्रयत्न अपुरे पडले.

वर्षांनुवष्रे नॅरोगेज रेल्वेचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होण्यासाठी खर्ची पडले. कै. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते व त्यांनी त्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतल्याने हे काम पूर्ण झाले. ब्रॉडगेज झाला म्हणजे विकास होतो काय? असा सवाल शिवराज पाटील चाकूरकर विचारत असत. ज्या भागात दळणवळणाची साधने नाहीत तिकडे ती प्राधान्याने सुरू व्हायला हवीत असा व्यापक विचार ते मांडत, त्यामुळे केंद्रात महत्त्वाच्या पदावर राहूनही लातूरकरांसाठी बीएसएफ, सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्राव्यतिरिक्त त्यांनी फारसे काही आणले नाही. ‘कधीच घरी येताना मुलासाठी काही न आणणाऱ्या बाबांच्या हातात दोन बिस्कीटपुडे आणल्यानंतर मुलांना जसा आनंद होतो तशी अवस्था तेव्हा लातूरकरांची झाली होती.’

देशात व राज्यात सत्तांतर झाले. त्यात लातूरकरांनी सहभाग नोंदवला. लातूरचा खासदार अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाला. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत, महापालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकांत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विजय संपादन केला. भाजपच्या मंडळींना आश्चर्य वाटावे अशी कामगिरी लातूरकरांनी करून दाखवली अन् त्यामुळे राज्य व केंद्राचे लातूरकडे लक्ष गेले. २०१५चा महाभयानक दुष्काळ, रेल्वेने पिण्याचे पाणी आणावे लागले व त्यानंतर जलयुक्त शिवाराच्या कामाच्या माध्यमातून ६०० टँकर ज्या जिल्हय़ात होते तेथे एकही टँकर लागला नाही इतके मोठे परिवर्तन झाले.

‘घोडा गुणावर चंदी खातो’ अशी म्हण प्रचलित आहे, त्यामुळेच लातूरकरांकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे राज्यकर्त्यांना वाटू लागले. यावर्षी अर्थसंकल्पापूर्वी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी आमच्या भागाने पक्षाला भरभरून दिले आहे तरी या भागासाठी विकासाचा मोठा प्रकल्प द्या अशी मागणी केली. त्यातून ‘रेल्वे बोगी’ कारखान्याची कल्पना पुढे आली अन् ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलून धरली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिसाद दिला व लागलीच अर्थसंकल्पात त्याचा समावेश झाला.

देशाच्या इतिहासात प्रथमच रेल्वेने घोषणा केल्यानंतर दोन महिन्यांत भूमिपूजनाचा विक्रम लातूरमध्येच नोंदवला गेला. पहिल्या टप्प्यात ४०० एकरांवर ५०० कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प मार्गी लागेल.  रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची घोषणा केली. रायबरेली मतदारसंघात २००७ साली रेल्वेच्या कारखान्याचे भूमिपूजन झाले होते. ते पूर्णत्वास येण्यास २०१४ साल उजाडले व त्याला गती आमच्या सरकारने दिली. दीड वर्षांच्या आत यातून बोगी बाहेर पडतील असे आश्वासित केले.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा पॅटर्न कसा असतो हे लातूरच्या माध्यमातून आपण राज्याला, देशाला दाखवून देऊ असे सांगत लातूरला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.
  • भाजपाच्या दृष्टीने बीड वगळता मराठवाडय़ातील अन्य सात जिल्हय़ांत बरे चित्र नव्हते. लातूरने निवडणुकीतील गुणवत्ता दाखवून देत वेगळेपण सिद्ध केले. मराठवाडय़ातील या दुर्लक्षित शहराची धान्य बाजारपेठ पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे.
  • शहाराला औद्योगिक चेहरा मिळाला तर हा परिसर विकासाची झेप नक्कीच घेईल. मराठवाडय़ाच्या विकासाचा केंद्रिबदू आता लातूरकडे सरकणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
  • आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्य़ात भाजपला चांगले यश मिळू शकते हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. यामुळेच भाजपच्या नेतृत्वाने लातूरकडे अधिक लक्ष दिले आहे.