लातूरमध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या मोसीन शेखची प्रेरणादायी कहाणी

कोणत्या कुटुंबात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नाही. मात्र, परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य अंगात आहे हे उराशी बाळगले तर माणूस अनंत अडचणींना पुरून उरू शकतो, याचा दाखलाच लातूरमध्ये वीटभट्टीवर चिखल तुडवत शिक्षणाचे अवघड धनुष्य पेलणाऱ्या मोसीन महेबूब शेख याने दिला आहे. अत्यंत प्रतीकूल आर्थिक परिस्थितीमध्ये मोसीनने चक्क सीए झाला आहे. शहरातील विद्यार्थ्यांसारख्या सुविधा, शैक्षणिक साहित्यांच्या अद्ययावत गरजा आणि आर्थिक-मानसिक पाठिंबा या सर्वाचा अभाव असताना मोसीनने मिळविलेल्या यशाचे शहरभर कौतुक होत आहे.

मोसीनचे आई-वडील दोघेही वीटभट्टीवर काम करतात. लहान भाऊ नववीपर्यंतचे शिक्षण घेऊन वीटभट्टीवरच काम करतो.  मोसीनला दहावीच्या परीक्षेत ७३ टक्के गुण मिळाले. त्यामुळे राजर्षी शाहू महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. अकरावीपासून महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त वेळेत तो वीटभट्टीवर काम करत असे. बीकॉम पदवी त्याने वीटभट्टीवर काम करतच मिळवली. कामातून मिळणाऱ्या पैशापेक्षा काहीतरी जीवनात करून दाखवायचे, अशी जिद्द ठेवत मोसीनने शिक्षणावर लक्ष्य केंद्रित केले. बीकॉम करतानाच त्याला सीए होण्यामागील महत्त्व कळले आणि त्याने कठोर तयारी सुरू केली. लातूर येथील सीए सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सीएच्या परीक्षेची तयारी त्याने सुरू केली. त्यांच्याकडे नोकरी करत त्याने अभ्यास सुरू ठेवला व दुसऱ्या प्रयत्नात त्याने परीक्षेत यश मिळविले. मोसीनला त्याचे भाऊ फारूख सय्यद यांनी शिक्षणासाठी हिंमत दिली.  विटा उचलण्यातील कष्टाचे मोल किती आणि कसे असते, याची लहानपणी काय कल्पना येणार? वीटभट्टीवर राबताना आई-वडील, मोठा भाऊ पाहातच मोठा झालो. मलाही तेच काम करावे लागत होते. आई-वडिलांनी शाळेत घातले. शिक्षकांनी ज्ञानाचे महत्त्व रुजवले. पण मोठं व्हायचे तर शिक्षण आणि त्यासाठी पैसा लागणार. त्यासाठी कष्ट करूनच  पैसे जोडले.  न थकता अभ्यास केला. माझ्या वाटचालीत सर्वानीच मदत केली व त्यामुळेच मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो, अशी प्रतिक्रिया मोसीनने व्यक्त केली.

पहाटेपासून ते अंधार पडेपर्यंत राबल्यानंतर कुठे ५०-१०० रुपये मिळायचे. त्यातून पोटासाठी किती आणि शिक्षणासाठी किती काढायचे, असा प्रश्न पालकांपुढे होता. माझे शिक्षणही चिखलाला तुडवण्यातून, विटा उचलण्यातून मिळणाऱ्या पैशातूनच झाले. शिक्षणाचे महत्त्व कळल्यानंतर मात्र काम विटांचे आणि लक्ष्य अभ्यासावर ठेवल्याने गती मिळत गेली.  सीए झाल्याचा आनंद मोठा मोलाचा आहे.
– मोसीन महेबूब शेख