लातूर शहराचा पाणीपुरवठय़ाचा प्रश्न राज्य शासनाने अतिशय गंभीरपणे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शहराला दररोज १ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रत्यक्षात उतरवत सरकार उत्तीर्ण झाले. मात्र, पुरेसे पाणी उपलब्ध करूनही ते योग्य पद्धतीने वितरीत करण्याची यंत्रणा उभी न करता आल्यामुळे सरकारने दिलेले पाणी लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली.

मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी सप्टेंबर महिन्यातच प्रसंगी लातूरला रेल्वेने पाणी देऊ मात्र पिण्याचे पाणी कमी पडू दिले जाणार नाही असे सांगितले होते. या वक्तव्यास लातूरकरांनीही गांभीर्याने घेतले नव्हते. लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ येईल याचा अंदाज प्रशासनालाही नव्हता. उपलब्ध पाणीपुरवठा पावसाळय़ापर्यंत पुरेल असा दावा प्रशासन करत असताना सरकारने रेल्वेने दररोज २५ लाख लिटर पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी निम्नतेरणा प्रकल्पातून दररोज ५० लाख लिटर पाणी लातूर शहराला पुरवण्याच्या योजनेचा शुभारंभ महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. डोंगरगाव बंधाऱ्यातून दररोज २५ लाख लिटर पाणी टँकरने उचलले जाते.  शहराला १ कोटी लिटर पाणी दररोज उपलब्ध होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेचे ७० टँकर पाणी वितरणात गुंतलेले आहेत. २०० लिटर पाणी एका कुटुंबाला काही प्रभागात सात दिवसांत तर काही प्रभागात २५ दिवसांत पोहोचते. माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे यांनी अनेक भागात अद्याप एकही पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचला नसल्याची तक्रार केली आहे.

‘सरकार आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था महापालिकेची झाली आहे. महापालिकेने प्रारंभी पसा उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले, त्यानंतर पाणी उचलण्यास परवानगी मिळत नाही, दिरंगाई होत आहे अशी कारणे सांगितली. त्यापुढे जाऊन कर्मचारीवर्ग अपुरा आहे हीही सबब सांगून झाली. महापालिकेने सांगितलेल्या सर्व समस्यांचे निराकरण राज्य शासनाने केले. पसा, पाणी व कर्मचारी पालिकेला उपलब्ध केले आहे. आता सरकारसंबंधी तक्रार करायला पालिकेला तसुभरही जागा नाही. सरकारने आपले काम पूर्ण केले आहे. पाणी लातूरच्या दारापर्यंत पोहोचवले आहे. मात्र महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेत सुधारणाच होत नाही. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा अनुत्तीर्ण झाल्याची भावना लातूरकरांच्या मनात आहे.

रिपाइंचे नेते चंद्रकांत चिकटे यांनी आपल्या प्रभागात टोकन पद्धतीने पाणी वितरणाचा प्रयोग केला व तेथे एकानेही गोंधळ केला नाही. दलित वस्तीत अतिशय शिस्तीत पाणी वितरण होऊ शकते तर हा प्रयोग संपूर्ण शहरभर करण्यात नक्की अडचण काय, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून दिले जात नाही.

शहरात सुमारे ८० हजार कुटुंब राहतात. २०० लिटर पाणी प्रत्येक कुटुंबाला द्यावयाचे ठरले तर दररोज १ कोटी पाणी उपलब्ध होत असल्यामुळे किमान तीन दिवसांतून एकदा हे पाणी देता येऊ शकते. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पाणी वितरणासाठी नियुक्त केलेले तीन उपजिल्हाधिकारी यांनी योग्य समन्वय ठेवला तर तीन दिवसांतून एकदा पाणी देता येऊ शकते, असा दावा केला जात आहे.

केवळ सहा तासात पाणी एक्सप्रेस मिरजेहून लातुरात मिरजहून लातूर शहराला येणाऱ्या पाणी एक्सप्रेसचे सर्व अडथळे रेल्वे प्रशासनाने दूर केले असून शनिवारी सकाळी ९.२० वाजता सुटलेली रेल्वे दुपारी ३.१५ वाजताच लातूर रेल्वेस्थानकात पोहोचली. लातूरच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न रेल्वे प्रशासनाने ऐरणीवर घेतला असून शनिवारी सलग पाचवी रेल्वे लातुरात दाखल झाली. रेल्वेच्या वॅगन वाढवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून सोमवारी कदाचित २५ वॅगनची रेल्वे सुरू होईल. शक्य तितक्या लवकर दररोज ५० वॅगनने पाणीपुरवठा करण्याचे रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेने आलेले पाणी आता लातूरकरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे.

कर्जतकरांची संवेदनशीलता

लातूरपासून ४०० किलोमीटर अंतरावरील लोणावळय़ाजवळील कर्जत येथील नागरिकांना लातूरच्या पाणीटंचाईची अवस्था वाचून व ऐकून अस्वस्थता जाणवली व त्यातून त्यांनी लातूरला आपल्या परीने पाणीपुरवठा करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. रेल्वेच्या एका वॅगनला २६ हजार रुपये खर्च येतो. तो करणे परवडत नाही त्यामुळे तेथील मंडळींतर्फे आरओ पाण्याचे दररोज ५० जार मुंबई-लातूर एक्सप्रेसच्या मालवाहतूक, अपंगांना बसण्यासाठीच्या डब्यातून पाठवले जातात. हे पाणी गेल्या आठ दिवसांपासून लातूरला येत आहे. रेल्वेस्थानकावर हे पाण्याचे जार उतरवून घेऊन रेल्वेस्थानक परिसरात राहणारी मंडळी घेऊन जातात व रिकामे जार पुन्हा रेल्वेत ठेवतात. पाण्याच्या बाबतीत आपल्यापरीने मदत करणाऱ्या कर्जतवासीयांचे आभार मानले जात आहे.