13 July 2020

News Flash

घनकचरा व्यवस्थापनात लातूर पालिका देशात अव्वल!

संपूर्ण राज्यात वेगळय़ा पद्धतीने व दखल घ्यावी, असे काम लातूरमध्ये होत असल्याचे त्यांनी कळवले.

दिवसभरात 1 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अवाढव्य वॉरियर यंत्र.

प्रदीप नणंदकर, लातूर

घनकचरा व्यवस्थापनाची समस्या ही शहरी, निमशहरी व ग्रामीण भागाला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे ठिकठिकाणच्या कचरा डेपोवर या परिसरातील लोक आंदोलने करतात. कचरा डेपोमुळे परिसरातील लोकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. राज्यातील ड वर्ग महापालिका असलेल्या लातूर मनपाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात देशातील महापालिकांमध्ये अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.

लातूर नगर परिषद होती तेव्हापासून शहराच्या लगतच्या वरवंटी कचरा डेपोवर कचरा साठला जात होता. त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रयोग काही महिने झाले. त्यासाठी कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली मात्र फारसे यश मिळाले नाही.  जनाधार सेवाभावी संस्थेमार्फत शहरातील कचरा गोळा करणे व त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील पंढरपूर, सासवड या नगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी यंत्रसामुग्री आणून केवळ तीन महिन्यांत कचरामुक्त शहर बनवण्याचा मान मिळविला होता, मात्र असे प्रयोग महापालिकेत झालेले नव्हते. शहरातील निर्माण होणारा कचरा कचरा डेपोवर टाकण्याऐवजी तो ओला व सुका असा वर्गीकरण करून शहरातील विविध प्रभागांत त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा निर्माण व्हावी ही अपेक्षा होती. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे व भाजपचे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी याकामी पुढाकार घेतला व आपल्या प्रभागात कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास प्रारंभ केला.

कचऱ्याचे वर्गीकरण करून उपलब्ध झालेले प्लास्टिक रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरण्याचा प्रयोगही गोजमगुंडे यांच्या पुढाकाराने झाला व त्यांच्या कचऱ्याच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीपर्यंत घेण्यात आली. शहरात ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा यासाठी घंटागाडीबरोबर स्वच्छताताई घरोघरी जाऊन नागरिकांना याबाबतीचे महत्त्व पटवून देत होत्या.  सुक्या कचऱ्यामधून कॅरीबॅग, कागद व खपट, कापड, चिंध्या, काचवर्गीय, चप्पल तळ, रबर, चामडे, सिमेंट व विविध धान्याची प्लास्टिकची पोती, थर्माकोल याचे वर्गीकरण शहरातील विवेकानंद चौक, कोंडवाडा व शासकीय कॉलनी येथे करण्यात येत आहे. कचऱ्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्यामुळे हरित लवादाने गोखले इन्स्टिटय़ूट पुणे येथील प्राध्यापिका प्रीती मस्तकार यांना तज्ज्ञ म्हणून विविध महापालिकेत नेमके कसे काम चालते आहे याची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले होते. त्यांनी नागपूर, नांदेड, परभणी, सांगली, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्याचे फोटो घेतले व नगरविकास खात्याला याचा अहवाल सादर केला.

संपूर्ण राज्यात वेगळय़ा पद्धतीने व दखल घ्यावी, असे काम लातूरमध्ये होत असल्याचे त्यांनी कळवले. पुणे येथे घनकचरा व्यवस्थापनासंबंधी झालेल्या कार्यशाळेत जगात जपाननंतर सुक्या कचऱ्याचे आठ प्रकारे वर्गीकरण केवळ लातूर महानगरपालिकेमध्येच केले जात असल्याचे प्रीती मस्तकार यांनी सांगितले. लातूरच्या जनाधार संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी याबद्दलची तपशीलवार माहिती सांगितली. लातूरमधील होत असलेल्या कामाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.  पंढरपूर व सासवड नगरपालिकेत केलेले प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नगरविकास खात्याने लातूर महापालिकेसाठी अशी मोठी मशीन देऊ केली आहे.  या भल्यामोठय़ा वॉरियर यंत्राद्वारे वाळू, माती, प्लास्टिक हे वेगळे होते व उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार होते. साठवल्या गेलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी ते हैदराबादला पाठवले जात असून खडी, वाळूपासून पेव्हर ब्लॉक तयार केले जाणार आहेत. पुढील सहा महिन्यात साचल्या गेलेल्या कचऱ्यावर पूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम अतिशय वेगाने होत असल्याचे महापालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

एकीकडे शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून दररोज जमा होणाऱ्या १५० टन कचऱ्यापैकी सुमारे ६० टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असताना उर्वरित ९० टन कचऱ्यावरही याच पद्धतीने प्रक्रिया व्हावी यासाठी अन्य प्रभागांत वर्गीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. शहरातील एक क्विंटलदेखील कचरा कचराडेपोवर टाकला जाऊ नये. त्याची विल्हेवाट शहरातच झाली पाहिजे, असा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. त्याचबरोबर शहराचे स्वरूप स्वच्छ शहर असे निर्माण व्हावे यासाठी महापालिका साहाय्यक आयुक्त वसुधा फड व उपायुक्त संभाजी वाघमारे यांनीही गेल्या काही महिन्यांपासून मेहनत घेणे सुरू केले आहे. शहरातील प्रमुख चौक रंगरंगोटी करून सजवले आहेत. त्याचबरोबर शहरातील घाणीचे ठिकाण म्हणून ज्यांची ओळख होती ती ठिकाणे निवडून ती सुशोभित करण्यात आली. स्वच्छतेच्या बाबतीत लोकसहभाग चांगला मिळत असून सध्या ५० टक्के प्रतिसाद आहे. लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव रुजावी यासाठी प्रबोधन सुरू असून संपूर्ण यश येण्यास किमान वर्ष लागेल, असा अंदाज प्रशासकीय मंडळींचा आहे.

नगरसेवकांचा पुढाकार

जनाधार सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने व काही नगरसेवकांच्या सहकार्याने असे प्रयोग सुरू झाले. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे व भाजपचे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी याकामी पुढाकार घेतला व आपल्या प्रभागात कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास प्रारंभ केला. कचऱ्याचे वर्गीकरण करून उपलब्ध झालेले प्लास्टिक रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरण्याचा प्रयोगही गोजमगुंडे यांच्या पुढाकाराने झाला .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2019 1:09 am

Web Title: latur municipal corporation tops in solid waste management
Next Stories
1 परिवहन सेवा मोफत?
2 अमानुष शिक्षेमुळे विद्यार्थी अत्यवस्थ
3 प्राथमिक सुविधांसाठी पाडय़ांचा संघर्ष!
Just Now!
X