13 December 2017

News Flash

अमित देशमुखांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला हादरा, लातूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

लातूर महापालिकेच्या ७० पैकी ३८ जागांवर भाजपचा विजय

लातूर | Updated: April 21, 2017 2:29 PM

लातूर महापालिकेत निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे.

लातूर हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता. लातूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून १९९५ चा अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व होते. लातूर म्हटल्यावर विलासराव देशमुख असे समीकरण झाले होते. सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या विलासराव देशमुखांना लातूरकरांनी नेहमीच साथ दिली होती. विलासरावांच्या निधनानंतर लातूरचे नेतृत्व त्यांचे पुत्र अमित देशमुख यांच्याकडे आले. लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अमित देशमुख विजयी झाले. आघाडी सरकारच्या काळात त्यांना राज्यमंत्रीपदही देण्यात आले होते. पण राज्यात भाजपची सत्ता येताच लातूरमधील राजकीय समीकरणही बदलू लागले.

लातूरच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. याची पुनरावृत्ती लातूर महापालिकेत करण्याचे मनसुबे भाजपने रचले होते. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अथक मेहनत घेतली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख या दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती.

शुक्रवारी लातूर महापालिकेसाठी मतमोजणी झाली. लातूरमध्ये भाजपने एकहाती सत्ता काबीज केली. तर काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. लातूर महापालिकेतील पराभव हा अमित देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर या विजयाने भाजपला मराठवाड्यात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रुपात एक नवीन नेता मिळाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

First Published on April 21, 2017 1:38 pm

Web Title: latur municipal election result 2017 bjp won congress defeat amit deshmukh sambhaji nilangekar patil