01 April 2020

News Flash

लातूरमध्ये भाजपच!

लातूर जिल्हय़ाच्या राजकारणात कायम काँग्रेस सत्तास्थानी राहिली व अन्य पक्ष दबावाखालील राजकारण करीत होते.

 

पालकमंत्री निलंगेकर-पाटील यांचा दबदबा वाढला

नगरपालिका निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ातील मंत्र्यांना व भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाही आपापल्या मतदारसंघांत अपयश पत्करावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर लातूर जिल्ह्य़ातील चारपैकी दोन नगरपालिकांमध्ये सत्ता संपादन करण्यात भाजपला यश आले. काँग्रेसची मात्र चांगलीच पीछेहाट झाली आहे. भाजपच्या विजयाने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा जिल्हय़ाच्या राजकारणावर चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.

लातूर जिल्हय़ाच्या राजकारणात कायम काँग्रेस सत्तास्थानी राहिली व अन्य पक्ष दबावाखालील राजकारण करीत होते. पहिल्यांदाच जिल्हय़ातील जनतेने काँग्रेसला पूर्णपणे झुगारून दिले असून पालिकेच्या निवडणुकीत सत्तेबाहेर ठेवले आहे. निलंगा नगरपालिकेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची सत्ता होती. मागील निवडणुकीत भाजपचे केवळ तीन नगरसेवक होते. या वेळी हिशोब चुकता करीत नगराध्यक्षासह २१ पकी १७ नगरसेवक भाजपचे निवडून आले व पालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळविली.

उदगीर नगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिकेत कधीही भाजपची सत्ता नव्हती व सत्तेच्या जवळपासही भाजपला जाता आले नव्हते. या वेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्थानिक आमदार सुधाकर भालेराव व माजी आमदार गोिवद केंद्रे यांची मोट बांधली व सर्व भाजप कार्यकत्रे एकदिलाने कामाला लागले. परिणामी आठ वेळा नगराध्यक्ष राहिलेले काँग्रेसचे राजेश्वर निटुरे यांना पराभव चाखावा लागला. ३८ नगरसेवकांपकी १८ नगरसेवक भाजपचे निवडून आले. काँग्रेसला १४ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. जिल्हय़ात पहिल्यांदाच एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले.

औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे बसवराज पाटील मुरुमकर यांच्या सत्तेला आव्हान देत एकहाती सत्ता मिळविली. नगराध्यक्षासह २० पकी १२ नगरसेवक राष्ट्रवादीने निवडून आणले. भाजपचे सहा तर काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

अहमदपूर पालिकेत पूर्वी राष्ट्रवादी काँगेसची सत्ता होती. या वेळी २० पकी नऊ नगरसेवक राष्ट्रवादीचे पुन्हा निवडून आले, मात्र नगराध्यक्षपद अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांच्या आघाडीला मिळाले. आघाडीला चार नगरसेवकांवरच समाधान मानावे लागले. भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले. काँगेस व शिवसेना यांचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले आहेत.

भाजप पहिल्या क्रमांकावर

जिल्हय़ातील १०१ नगरसेवकांपकी भाजपने ४७ नगरसेवक निवडून आणून पहिल्या क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस असून, २२ जण निवडून आले आहेत. काँग्रेसला केवळ २० नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. एमआयएमने सहा नगरसेवक निवडून आणून आपले अस्तित्व दाखवले आहे. स्वबळावर निवडणूक लढवलेल्या शिवसेनेला या वेळी दोन जागांवर समाधान मानावे लागले. मात्र अहमदपुरात शिवसेनेमुळे भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला याचा आनंद घेता आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून चारही पालिकेच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. त्याचा चांगला परिणाम झाला. भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेचा परिणाम अधिक आहे. राष्ट्रवादीने आपल्या परीने कसूर न करता सर्व ठिकाणी प्रचारात जोर लावला. उदगीरमध्ये राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही, मात्र इतर तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. चारपकी दोन पालिकेत सत्ता असणाऱ्या काँग्रेसला आता सत्तेशिवाय राहावे लागणार आहे. लातूरच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती आली आहे.

एके काळी राज्याचे मुख्यमंत्रिपद व केंद्रात गृहमंत्रिपद जिल्हय़ाला होते याचे आता गोडवेच गावे लागणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी औसा शहरात प्रचारसभा घेतली होती, मात्र तेथे काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या यावरून त्यांचे स्थान लक्षात यावे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी उदगीर पालिकेत प्रचाराचा शुभारंभ केला व शेवटच्या दिवशी जिल्हय़ाच्या अन्य पालिकांत प्रचारसभा घेतल्या. मात्र या सभेचा परिणाम झाला नाही. करिश्मा असणारा नेता आता काँग्रेसकडे शिल्लक राहिलेला नाही. नोटाबंदीपासून अनेक विषय प्रचारसभेमध्ये ठासून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र लोक राज्य व केंद्रातील सत्ता असणाऱ्या मंडळींच्या सोबत असल्याचे पालिकेच्या निकालावरून स्पष्ट झाले.

भाजपसाठी दिलासा

पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात भाजपला राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत तेवढे यश मिळाले नव्हते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले होते. भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता. या पाश्र्वभूमीवर लातूर जिल्ह्य़ात मिळालेल्या यशाने भाजपला तेवढाच दिलासा मिळाला आहे. लातूर म्हणजे काँग्रेस हे समीकरण पूर्वी होते. भाजपने आता ही जागा घेतली आहे.

  • नगराध्यक्षपदे – ४
  • भाजप – २
  • राष्ट्रवादी – १
  • स्थानिक आघाडी – १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2016 2:00 am

Web Title: latur nagar palika election result bjp sambhaji nilangekar patil
Next Stories
1 विदर्भातील निम्मी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित
2 निश्चलनीकरणानंतर.. कांदा क्विंटलला सतराशेहून सातशेवर
3 भडकपणा येऊ न  देण्याची काळजी
Just Now!
X