प्रदीप नणंदकर, लातूर

रेल्वेने पाणी आणलेल्या गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेली कामे, रेल्वे बोगीच्या कारखान्याची घोषणा, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढता लोकसंपर्क अशी भाजपची शक्ती. त्या विरोधात काँग्रेसचा गड लातूरची अलीकडच्या काळातील धूसर प्रतिमा असा प्रचाराचा रंग लोकसभा निवडणुकीत चढू लागेल. हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ पुन्हा राखण्यासाठी भाजपचे नेते कामाला लागले आहेत तर विलासरावांच्या पुण्याईच्या वाटेने हा गड पुन्हा आपल्या ताब्यात राहावा, असे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लातूरची लोकसभा काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.

Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
narendra modi
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा! पंतप्रधान मोदींचा आरोप; काँग्रसचे प्रत्युत्तर

वर्षांनुवर्षे काँग्रेसचा गड राहिलेला हा मतदारसंघ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या ताब्यात घेतला. भाजपचे खासदार म्हणून सुनील गायकवाड यांनी अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवत विजयश्री मिळविली. केवळ दोन अपवादवगळता सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. सामना दुरंगी असो अथवा तिरंगी, काँग्रेसचे यश ठरलेले असायचे. शिवराज पाटील चाकूरकर यांनी या मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी मांडलेले मांडे मनातल्या मनातच राहिले. मात्र २००४ साली भाजपच्या नवख्या उमेदवार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकरांचा पराभव केला. हा पराभव त्यांना धक्कादायक होता. २००९ साली हा मतदारासंघ राखीव झाला. त्यामुळे चाकूरकरांच्या पराभवाची जखम कायम वाहती राहिली.

लातूर मतदारसंघ राखीव झाल्यावर २००९ मध्ये विलासराव देशमुख यांनी इचलकरंजीच्या जयंतराव आवळे यांना लातूरमध्ये आयात केले. आयात उमेदवार म्हणून आवळेंना मोठा विरोध झाला. भाजपाचे सुनील गायकवाड यांनी तेव्हाही चांगली लढत दिली होती. २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी जनतेतून उमेदवार निवडावा यासाठी देशातील काही मतदारसंघ निवडले व त्यात लातूर लोकसभेचा समावेश होता. तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांना जनतेतून उमेदवारी मिळाली. मात्र, मोदी लाटेत त्यांचा टिकाव लागला नाही. काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ प्रचंड मताने भाजपने खेचून घेतला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली व नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका अशा प्रत्येक निवडणुकीत भाजपने यश मिळविले. काँग्रेस ‘बॅकफुट’वर गेली होती. ती कायमस्वरूपी मागच्या बाकावर राहावी अशी रचना भाजपची मंडळी करत आहे. अगदी अमित शहापासून ते राज्याच्या प्रमुख नेत्यांनी लातूरवर जरा अधिकच प्रेम केले आहे. त्यामुळे भाजपच्या नेतेमंडळींचा आत्मविश्वास वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला उमेदवार मिळेल की नाही अशी शंका असताना तब्बल ५७ जणांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसकडे रीतसर अर्ज केले आहेत. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात व लातूर येथील जिल्हा कार्यालयात इच्छुकांनी आपल्या मुलाखतीही दिल्या आहेत. या निवडणुकीत स्थानिक उमेदवारांनाच संधी मिळाली पाहिजे. मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी होत आहे. स्थानिक उमेदवारांनी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर सर्वजण एकदिलाने काम करू अशी ग्वाही दिली आहे. इच्छुकांची संख्या मोठी त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही तेही प्रचारात सक्रिय राहतील अशी काळजी घेत काँग्रेसला उमेदवार निवडावा लागणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यांनी मतदारसंघातील अनेक गावात सभांचा सपाटा लावला आहे. रस्त्यावर उतरून मोच्रेही काढले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसला साथ मिळेल तर भाजपबरोबर शिवसेनेची युती झाल्यामुळे भाजपाची बाजूही मजबूत होत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणीच काँग्रेसचे आमदार आहेत तर चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेत असले तरी ते मनाने भाजपत आहेत. केंद्र व राज्य सरकारवरील नाराजीचा लाभ काँग्रेसला मिळेल, असा आशावाद अनेकांच्या मनात आहे.  तो मतपेटीपर्यंत पोहोचवण्याची यंत्रण उभी करणे इतकेच काम आहे, असे कार्यकर्ते सांगतात. ही यंत्रणा उभी राहिली की उमेदवार कोण हा प्रश्न गौण राहील असे काँग्रेसला वाटते आहे. संघटनात्मक रचनेला साखरेच्या राजकारणाची जोड आहे. दुसरीकडे भाजपनेही पुन्हा सुनील गायकवाड यांनाच उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल मौन बाळगले आहे. जो कोणी उमेदवार पक्ष जाहीर करेल तो तीन लाखांपेक्षा अधिक मताने विजयी होईल असे भाजपची मंडळी सांगत आहेत. मात्र, भाजपमध्येही टोकाची अंतर्गत गटबाजी आहे. ही गटबाजी डोके किती वर काढते, की निवडणुकीपुरती गटबाजी दूर करण्यात भाजपला यश मिळते यावर भाजपचे भवितव्य आहे.

वैयक्तिक पातळीवर खासदारांनी संबंध चांगले ठेवले असले तरी लातूरचा दबदबा कायम ठेवण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आले आहे. उजनीचे पाणी लातूरला आणणार अशी घोषणा निवडणुकीत केली होती. त्याचे काय झाले? लातूर एक्सप्रेस बिदरवाल्यांनी पळवली तेव्हा नवीन मुंबईसाठी रेल्वे सुरू केली जाईल अशी घोषणा केली होती. त्याचे काय झाले, असे प्रश्न उपस्थित करून मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपचा विजय झाला असला तरी आता परिस्थिती बदलली आहे. या मतदारसंघात कायम काँग्रेसच विजयी होत राहिली आहे. काँग्रेसची मतदारसंघावर पकड आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत काँग्रेसच विजयी होईल.

      – अ‍ॅड. व्यंकट बेद्रे,  ग्रामीण जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

देशातील चौथ्या क्रमांकाची मेट्रो बोगी तयार करण्याचा कारखाना सुरू झाला. १६० कोटी रुपयांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण होत आले. पासपोर्ट कार्यालय, विभागीय पोस्ट कार्यालय, नीट परीक्षा केंद्र, मालगाडी व पॅसेंजर अशा नव्या २१ रेल्वेगाडय़ा लातूरहून सुरू केल्या. लातूर, उदगीर व लातूररोड येथील प्लॅटफॉर्मची संख्या वाढवली. लातूर रेल्वेस्थानक सी क्रमांकावरून ए क्रमांकावर आले. रेल्वे पोलीस चौकी लातुरात झाली. गुलबर्गा ते औरंगाबाद ही इस्तेमासाठी आठ दिवस रेल्वे चालवली. आषाढी, कार्तिकी यासाठी पंढरपूरला नांदेड, बिदर, लातूर येथून रेल्वे सोडल्या. मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री जीवनज्योत योजना, ११ हजार कोटींचे रस्ते, जलसंधारणात देशात पहिला क्रमांक, महात्मा फुले जनारोग्य योजना अशा विविध योजना राबवल्या.  संसदेतील ९६ टक्के उपस्थिती व देशातील दर्जेदार काम करणारा चौथा लोकसभा सदस्य अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे मतदार  पुन्हा एकदा संधी देतील असा विश्वास वाटतो.

-डॉ. सुनील गायकवाड, खासदार लातूर