दिलीप देशमुख यांच्या सल्ल्यानेच महत्त्वाचे निर्णय घेण्याची अमित देशमुख यांची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या नातेसंबंधाला वेगळे महत्त्व आहे. काकाच्या मुशीत राजकारणात तयार झालेल्या पुतण्याने नंतर काकालाच झिडकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. लातूरच्या राजकारणात मात्र उलटे चित्र सध्या बघायला मिळत आहे. यापुढे काकांचे ऐकणार असल्याची जाहीर कबुली दिली आहे ती पुतण्याने. लातूरचे हे काका-पुतणे आहेत, आमदार दिलीपराव देशमुख आणि आमदार अमित देशमुख. मध्यंतरी काका-पुतण्यात बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा होती. पण अमितभय्यांनी भविष्यातील खडतर राजकारणाची वाट ओळखत काकांच्या सल्ल्याने घेण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’ गाजला. अन्य काका-पुतण्यांचे संबंध लक्षात घेता देशमुख काका-पुतण्यांचा ‘लातूर पॅटर्न’ महत्त्वाचा ठरणार आहे.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात

काका-पुतण्याचे प्रारंभी सख्य व त्यानंतर एकमेकांच्या विस्तव जात नाही असे घडल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राने पाहिली. बाळासाहेब ठाकरे – राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे – धनंजय मुंडे, बीडचे भारतभूषण क्षीरसागर – संदीप क्षीरसागर, अशोक पाटील निलंगेकर – संभाजी पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे – त्यांचे पुतणे अशी अनेक उदाहरणे आहेत. काही ठिकाणी पुतण्याने काकांवर मात केली, तर काही ठिकाणी काकांनी पुतण्याला वर येऊ दिले नाही. लातूरच्या राजकारणात मात्र वेगळे घडते आहे.

काका दिलीपराव देशमुख व  पुतणे अमित देशमुख हे लातूर जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर तीन दिवसांपूर्वी होते. या कार्यक्रमात अमित देशमुख यांनी आपला कारखाने सुरू करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकल्याची जाहीर कबुली या कार्यक्रमात दिली. दुष्काळामुळे साखर कारखाने सुरू केले तरी ते चालणार नाहीत व अकारण मोठा तोटा होईल, असे काकांनी आपल्याला सांगितले होते, मात्र अतिउत्साहात आपण त्यांचे म्हणणे ऐकले नाही. विलासराव देशमुखांचे साखर कारखाने बंद पडणे योग्य नाही. लोकांना काय वाटेल? असा विचार करून आम्ही कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र आता तो किती महागात पडला हे आम्हाला लक्षात आले आहे. यापुढे केवळ साखर कारखानदारीच नाही, तर सर्व प्रकारच्या निवडणुकांतही काका सांगतील त्याप्रमाणेच आपण ऐकणार असल्याचे अमित देशमुख म्हणाले.

लातूरच्या राजकारणाचा बाज काही निराळाच. विलासराव देशमुख यांची वाटचाल सरपंचपदापासून सुरू झाली. विलासराव हे केवळ जिल्हय़ाचे नाही तर राज्याचे व देशाचे नेतृत्व करतील हा अंदाज घेऊन जिल्हय़ातील जिल्हा बँक, जिल्हा परिषद, बाजार समिती, साखर कारखाने या संस्था बळकट व्हायला हव्यात, त्यांचा पाया मजबूत व्हायला हवा या उद्देशाने विलासरावांचे धाकटे बंधू दिलीपराव देशमुख यांनी त्यात लक्ष घातले. उस्मानाबाद जिल्हा विभाजनानंतर अडचणीतील लातूर जिल्हा बँक त्यांनी बाहेर काढली व राज्यातील अग्रणी बँकेच्या पंक्तीत तिला मानाचे स्थान मिळवून दिले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर अकरा महिन्यांत नियोजन करत जिल्हा परिषदेचा कारभारही राज्यातील पहिल्या क्रमांकावर त्यांनी नेऊन ठेवला. मांजरा साखर कारखान्याने मिळविलेल्या देदीप्यमान यशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनीही आपल्या तोंडात बोटे घातली.

पालिका प्रचाराचे धडे

१९९५ मध्ये विलासराव देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी राजकारणात प्रवेश केला. ग्रामीण भागाचा फारसा संबंध नसलेला, संपूर्ण शिक्षण मुंबईत झालेले असतानाही त्यांनी पुढे विकास साखर कारखाना सुरू केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर अमित देशमुख यांचे राजकारणातील स्थान महत्त्वपूर्ण ठरले. लातूर नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचाराची सूत्रे अमित देशमुख यांनी स्वत:कडे घेतली. नगरपालिका, बाजार समिती, जिल्हा परिषद या संस्थांच्या राजकारणातून टप्प्याटप्प्याने दिलीपराव देशमुखांनी लक्ष कमी केले व ती जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे नकळत गेली. त्यानंतर दोन वेळा ते लातूर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. जसे प्रत्येक ठिकाणी होते, त्याप्रमाणे लातुरातही अमित देशमुख आल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली, मात्र या चच्रेकडे दिलीपरावांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला. विलासरावांचे अकाली निधन व दिलीपरावांच्या प्रकृतीच्या तक्रारी यामुळे दिलीपरावांनी अमित देशमुख यांच्या राजकारणाला बळकटी मिळावी यासाठी व्यूहरचना आखली. त्यातूनच साखर कारखाने सुरू करू नका असे सांगितले असतानाही ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण असली तरी प्रत्येक वेळी मागून येणाऱ्या माणसाला ठेच लागते असे असते का, असे वाटून काही निर्णय रेटले गेले. अर्थात, आपण घेतलेले निर्णय हे सपशेल चुकले याची जाणीव झाल्यानंतर त्याची जाहीर कबुली अमित देशमुख यांनी दिली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भविष्यातील वाटचालीसाठी ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा वाटल्यामुळेही अमित देशमुख यांनी जिल्हय़ाची माहिती असलेल्या दिलीपराव देशमुखांचा सल्ला यापुढे घेणार असल्याचे जाहीर केले.