राज्यात करोनाचं थैमान सुरूच आहे. त्यामुळे सरकारकडून गर्दी टाळण्यावर भर दिला जात असून, गर्दी होणाऱ्या ठिकाणी अजूनही निर्बंध कायम ठेवले आहेत. विशेषतः राज्यात मंदिरं खुली करण्याची मागणी होत असतानाही सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर न उघडण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, निर्बंध असतानाही लातूर जिल्ह्यात मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीनं मंदिर व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.

करोनामुळे राज्य सरकारनं मंदिर खुली करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, अशात लातूर जिल्ह्यातील माखणी थोर येथील हनुमान मंदिर खुलं भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. या प्रकरणाची दखल घेत ग्रामपंचायतीनं मंदिर व्यवस्थानाला नोटीस बजावली आहे. शनिवारी भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आल्याचं कळाल्यानंतर नोटीस बजावण्यात आली, असं माखणी थोरचे सरपंच श्रीनिवास अशोक यांनी सांगितलं. हे मंदिर राज्यातील व आंध्र प्रदेश, कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असल्याचं सरपंच श्रीनिवास अशोक यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून मंदिर खुली करण्याची मागणी होत असतानाच मंदिर उघडण्यात आलं आहे. भाजपासह वंचित बहुजन आघाडीनंही राज्यात मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन केलं होतं. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलनं केलं होतं. त्यावेळी लवकरच मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन राज्य सरकारनं त्यांना दिलं होतं. मात्र, या आंदोलनाला बराच काळ लोटला, तरी अद्यापही निर्णय झालेला नाही. मात्र, ऑक्टोबरपासून मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

राज्य सरकारकडून हळूहळू निर्बंध शिथिल केले जात असले, तरी करोनाचा प्रसार कमी झालेला नाही. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडताना दिसत आहे. सध्या राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १३ लाखांच्या पुढे गेला आहे.