लातूर:  गेल्या आठवडाभरापासून लातूर जिल्ह्य़ातील प्राणवायूचा पुरवठा मागणीच्या केवळ ७० टक्के इतकाच होत असल्याने करोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांचा ताण वाढला आहे. प्रत्येक रुग्णालयाच्यावतीने प्राणवायूचा पुरवठा व त्यावरील देखरेख करणे यासाठी २४ तास कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते आहे.

देशभर प्राणवायूची गरज वाढली व पुरवठा कमी होतो आहे. कर्नाटक राज्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने बेल्लारीहून लातूरला येणारा प्राणवायूचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. जेथून कुठून शक्य असेल तेथून प्राणवायू उपलब्ध केला जातो आहे. मात्र दररोज केवळ पाच-सहा तास पुरेल इतकाच प्राणवायू शिल्लक राहत असल्याने डॉक्टरांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार आहे.

रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना प्राणवायूच्या या ताणामुळे झोप लागत नसल्याने त्यांच्यावरच उपचार करण्याची वेळ आली आहे. आणखीन किमान आठ ते दहा दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

मागणीपेक्षा पुरवठा कमी

गेल्या आठवडाभरापासून प्राणवायूची मागणी वाढली आहे व पुरवठा कमी आहे. प्रत्येक रुग्णालयाला त्यांच्या मागणीपेक्षा कमीच पुरवठा होतो आहे. प्राणवायूचा पुरवठा करताना आमच्या कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत असल्याचे गिल्डा एजन्सीचे विनोद गिल्डा यांनी सांगितले. प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करते आहे

प्राणवायूचा पुरवठा गेल्या आठवडाभरापासून पुरेसा होत नाही हे मान्य केले. आणखी आठवडाभर अशीच स्थिती राहील, असा इशारा दिला. सुदैवाने आतापर्यंत प्राणवायू कमी पडला म्हणून रुग्णांना प्राण गमवावे लागले किंवा अन्य रुग्णालयात हलवावे लागले, अशी स्थिती आलेली नाही. प्रशासन प्राणवायूचा पुरवठा अधिकाधिक होईल यासाठी डोळ्यात तेल घालून काम करते आहे. संपूर्ण देशभरातच प्राणवायूचा तुटवडा आहे. या परिस्थितीची जाणीव लक्षात ठेवून सर्वानीच या कठीण प्रसंगाला धीराने सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

‘आयएमए’चे आवाहन

रुग्णालय हे रुग्णावर उपचार करण्याचे काम करतात. रेमडेसिविर व अन्य औषधे किंवा प्राणवायू पुरवण्याचे काम शासनाचे आहे. त्यात प्रचंड प्रमाणात अनियमितता आहे. त्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. अनेक डॉक्टर व आरोग्य कर्मचारी करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. जनतेने रुग्णालयाची अडचण लक्षात घ्यावी व सहकार्य करावे. डॉक्टर रुग्णावर उपचार करण्यास बांधील आहेत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष राजकुमार लोंढे व लातूरच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे यांनी सांगितले.