News Flash

अमित देशमुखांच्या बढतीने लातूरकरांच्या अपेक्षा वाढल्या

खाते कोणते का असेना, या प्रश्नावर ते कसे भिडतात यावर लातूरकरांचे प्रेम अवलंबून असणार आहे.

प्रदीप नणंदकर, लातूर

चढत्या क्रमाने सुरू असणारी आमदार अमित देशमुख यांची वाटचाल आता कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचली आहे, पण त्यांच्यासमोर आव्हान असेल ते लातूरच्या पाणीपुरवठय़ाचे. २०१६ ते २०१९ दरम्यान निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपला लातूरमध्ये शिरकाव करता आला. मंत्री संभाजी पाटील यांनी या संधीचे सोने केले. या पुढच्या काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्याचा पुरवठा सुरळीत करणे हे त्यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. खाते कोणते का असेना, या प्रश्नावर ते कसे भिडतात यावर लातूरकरांचे प्रेम अवलंबून असणार आहे.

आमदार अमित देशमुख यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपले सरकार सत्तेवर आले तर केवळ एका महिन्यातच उजनीचे पाणी लातूरकरांना मिळेल असे आश्वासन दिले होते. निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेपूर्वीच आमदार देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन लातूर शहराच्या पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य थेट राज्यपालांपर्यंत पोहोचवले होते. नशिबाने अमित देशमुख यांना चांगलीच साथ दिली असून त्यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने त्यांच्याकडील अपेक्षांची जंत्री आता वाढू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी उलटून गेला. अमित देशमुख यांनी मंत्रिपदाची शपथ ३० डिसेंबर रोजी घेतली. १ फेब्रुवारीपूर्वी म्हणजे एक महिन्याची मुदत संपल्याबरोबर लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात उजनीचे पाणी पोहाचणार का, असा प्रश्न समाजमाध्यमातून विचारला जात आहे.

राज्यातील सरकार स्थापन होण्यापूर्वीच लातूर महापालिकेत भाजपाचे बहुमत असतानाही काँग्रेसने भाजपची मते फोडून महापालिकेतील महापौर व उपमहापौर अशी दोन्ही पदे ताब्यात घेतली. काँग्रेससाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. या अनुकूल स्थितीचा लाभ लातूरकरांना व्हावा ही स्वाभाविक अपेक्षा जनतेची आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांची संख्या वाढली पाहिजे. महापालिका अनेक अर्थाने आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजना राबवण्यासाठी महापालिका स्वतच्या निधीचा सहभाग देऊ शकत नसल्याबद्दल विकासकामे खोळंबली आहेत. शहरातील करवाढीचा प्रश्न लोंबकळत पडल्याने पालिकेची वसुली नाही. याबाबतीतही लवकर निर्णय होऊन प्रश्न मार्गी लागतील ही अपेक्षाही वाढली आहे.

महापालिकेने उद्योजकांना लावलेला कर तातडीने भरावा यासाठी तगादा लावला आहे, तर उद्योजकांचे म्हणणे महापालिकेचे आम्ही एवढे देणेच लागत नाही असे आहे. हा तिढा सुटत नाही त्यामुळे महापालिकेला पैसे मिळत नाहीत व उद्योजक जाणीवपूर्वक महापालिका त्रास देत असल्याचा दावा करत असल्याने पैसेही भरत नाहीत. अशी स्थिती बाजार समितीच्या आवारात काम करणाऱ्या आडत व्यापाऱ्यांची आहे. त्यांनाही महापालिकेने कर भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तोही प्रश्न प्रलंबित आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील जागेच्या भाडय़ाचा व करारनाम्याचा प्रश्न तसाच लोंबकळत पडला आहे. या व अशा बारीकसारीक प्रश्नांमध्ये अमित देशमुखांनी लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा शहरवासीयांची आहे.

अमित देशमुखांच्या अभिनंदनाचे शिवसेनेकडून फलक

सोमवारी दुपारी अमित देशमुख यांनी राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याचे समजताच सायंकाळपर्यंत शहरात प्रमुख रस्त्यांवर व विविध चौकात अभिनंदनाचे डिजिटल फलक झळकले. काँग्रेस कार्यकत्रे यात आघाडीवर होतेच. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी अमित देशमुख यांचे अभिनंदन करणारे फलक लावले.  शिवसेनेची जिल्हय़ातील संघटनात्मक स्थिती अतिशय तोळामासाची आहे. जिल्हय़ाला मंत्रिपद मिळाल्याने शिवसनिकांना आता विविध ठिकाणी सत्तेत स्थान मिळेल अशी आशा बळावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:36 am

Web Title: laturkar expectations increased from amit deshmukh zws 70
Next Stories
1 गटबाजीमुळे रणजीत कांबळे यांची वर्णी नाही
2 संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला खा. भावना गवळींचे आव्हान!
3 कचराभूमीतील धुराने कोंडमारा
Just Now!
X