सोलापूरातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोबळे यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला आहे. सोलापूर लोकसभेसाठी ढोबळे भाजपाकडून इच्छुक आहेत. मंगळवेढा आणि मोहोळहून ते विधानसभेवर निवडूनही गेले आहेत. उस्मानाबादमधूनही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

लक्ष्मणराव ढोबळे अजित पवार यांच्यावर नाराज होते. सातत्याने डावलले जात असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली होती. याकाळात ढोबळे भाजपाशी संपर्कात होते. गेल्यावर्षी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी नितीन गडकरींची ढोबळेंनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने त्यांच्या भाजपा प्रवेशावरून राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना प्रवेशापासून दूर रहावे लागत होते. आज अखेर त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहुर्त लागला.

एकेकाळी लक्ष्मणराव ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेते होते. राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रीपदही देण्यात आले. गेल्या निवडणुकीत ढोबळे यांना डावलून रमेश कदम यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. तिकीट न मिळाल्यानं ढोबळेंनी बंडखोरी केली.