स्थानिक संस्था कराचा भरणा करावा, यासाठी परभणी महापालिकेने व्यापाऱ्यांना पुन्हा बजावले असून, गेल्या काही महिन्यांपासून संशयास्पदरीत्या काही व्यापारी कमी स्थानिक संस्था कर भरत आहेत, याकडेही महापालिकेने लक्ष वेधले आहे.
एलबीटीबाबत तिढा कायम असून नव्याने स्थापन झालेल्या परभणी महापालिकेला स्वतचे उत्पन्नाचे स्रोत बळकट करण्यासाठी वारंवार स्थानिक संस्था कराबाबत व्यापाऱ्यांना आवाहन करावे लागत आहे. बुधवारी महापालिकेने या संदर्भात पत्रक काढून वारंवार आवाहन करूनही व्यापारी एलबीटीला प्रतिसाद देत नसल्याचे, तसेच कराचा भरणा करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. वेळोवेळी विवरणपत्र सादर करण्यासंबंधी जाहीर नोटिसा बजावून, तसेच एसएमएसच्या माध्यमातून सांगूनही व्यापारी प्रतिसाद देत नसल्याचे महापालिकेने पत्रकात म्हटले आहे.
शहर हद्दीत व्यवसाय करणाऱ्या व नोंदणीस पात्र असणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्यास वैध नोंदणी प्रमाणपत्र असल्याखेरीज मनपा हद्दीत व्यवसाय करता येत नाही. नोंदणी न करता व्यापार करणाऱ्यांवर स्थानिक संस्था कराच्या रकमेच्या पाचपट दंड वसुलीची तरतूद आहे. स्थानिक संस्था कराचा भरणा न केल्यास किंवा कमी दराने भरणा केल्यास प्रत्येक महिन्यासाठी थकित रकमेवर स्थानिक संस्था कर नियमाप्रमाणे दोन टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. महापालिका स्थानिक संस्था कर नियमान्वये २०१३-१४ च्या आर्थिक वर्षांचे विवरणपत्र सादर करण्याची कालमर्यादा ३० जूनपर्यंत आहे. या संदर्भात वारंवार आवाहन करूनही बऱ्याच व्यापाऱ्यांनी वार्षकि विवरणपत्र सादर केले नाही. असे करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर नियमानुसार पाच हजार रुपये दंड लावण्याची तरतूद आहे. अनेक व्यापारी काही महिन्यांपासून संशयास्पद प्रमाणात कमी स्थानिक संस्था कर भरीत असल्याचेही महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. विवरणपत्र दाखल करण्याबाबत संबंधित व्यापाऱ्यांना पुन्हा आवाहन करण्यात आले आहे. मुदतीत दाखल न केल्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल व त्याबाबत प्रत्येक कालावधीसाठी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल. स्थानिक संस्था कराचा योग्य भरणा करून पुढील अपरिहार्य कारवाई टाळावी, असे आवाहन उपायुक्त दीपक पुजारी यांनी केले आहे.