एलबीटी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती असून यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट होणार आहे. अशा स्थितीत उत्पन्न वाढीसाठी नागरिकांवर कराचा बोजा वाढू शकेल, असा इशारा शहर विकास आघाडीचे पालिकेतील गटनेते गुरुमितसिंग बग्गा यांनी दिला आहे.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेत बग्गा यांनी ‘एलबीटी: शहराला तारक की मारक’ या विषयावर चौथे पुष्प महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष खुशालभाई पोद्दार, नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे यांसह नगरसेवक बग्गा यांनी गुंफले.
एलबीटी विरोधात पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर यांसह अन्य ठिकाणी व्यापाऱ्यांनी बंद पाळला असताना नाशिकमध्ये मात्र एलबीटीला पाठिंबा देणे हे आश्चर्यकारक आहे. एलबीटीमुळे मनपाच्या उत्पन्नात घट होईल तसेच ‘इन्स्पेक्टर’ राज आणि भ्रष्टाचार वाढेल. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी जकातीला विरोध केला तसाच एलबीटीला देखील विरोध करावयास हवा होता, असे मतही बग्गा यांनी मांडले. पोद्दार यांनी जकातीमुळे निर्माण झालेल्या अडचणी, मालवाहतूक करताना नाक्यांवर होणारी अडवणूक या गोष्टी एलबीटीमुळे संपुष्टात येतील असा दावा केला. नाकाविरहित पद्धती आणि सुटसुटीत कर प्रणालीमुळे औरंगाबादसारख्या ठिकाणाप्रमाणेच नाशिकमध्येही एलबीटीमुळे उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेळे यांनी जागतिकीकरणाशी सुसंगत कर प्रणाली म्हणून एलबीटीचा विचार झाला असल्याकडे लक्ष वेधले. महापालिकेचे जकात उत्पन्न दोनशे कोटींनी वाढले याचा अर्थ ठेकेदाराच्या ताब्यात यंत्रणा असताना चारशे कोटीचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.