एकीकडं जनता करोनाचा मुकाबला करत असताना राज्यात राजकीय आरोपप्रत्यारोप जोरात झडत आहेत. राज्य सरकारच्या कामाविषयी विरोधकांकडून राज्यपालांकडे तक्रारी केल्या जात आहेत. विरोधकांच्या या कृतीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीकेचे बाण सोडले. “तुम्ही सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत राज भवनाच्या पायऱ्यांवर बसून महाराष्ट्र सरकारच्या नावानं झांजा वाजवल्यावर हस होणारच,” असा चिमटा काढत राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.

एका मुलाखतीत संजय राऊत यांना ‘विरोधी पक्षनेत्यांनी आधी राज्यपालांची भेट घ्यायला हवी की मुख्यमंत्र्यांची,’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले,”विरोधकांनी त्यांच्या मागण्या सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यांकडं करायला हव्या. मुख्यमंत्री राज्याचे लोकनियुक्त प्रमुख आहेत. प्रशासनाचे प्रमुख आहेत. विरोधी पक्षनेत्याला पूर्ण अधिकार आहे की, मुख्यमंत्र्यांना एखादी गोष्ट जोरात सांगण्याचा अधिकार आहे. राज्यात विरोधी पक्षनेत्यांचा सन्मान राखण्याची मोठी परंपरा आहे. शरद पवार, मनोहर जोशीपासून ते प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे. त्यांचं काम पाहा. सध्या विरोधी पक्ष सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महाराष्ट सरकारच्या नावानं खडे फोडाल, झांजा वाजवाल. त्या राज भवनाच्या बाहेरच्या पायऱ्यांवर बसून. याच्यामध्ये विरोधी पक्षाचं हसं होत आहे आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर महाराष्ट्र बदनाम होणार नाही. महाराष्ट्राला एक कार्यक्षम मुख्यमंत्री मिळालेला आहे. जनता त्यांच्या कामावर खुश आहे,” असं राऊत म्हणाले.

आणखी वाचा- विरोधी पक्षनेत्याचं घर राजभवनाच्या दारात आहे का?; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

मुख्यमंत्री विरोधकांच्या योग्य सूचना स्वीकारतील

“देवेंद्र फडणवीसांना पाच वर्ष राज्याचा कारभार करण्याचा उत्तम अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला मिळवून दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सहकार्य केलं पाहिजे. प्रशासनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या पाहिजे. मला खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या योग्य सूचना नक्की ऐकतील,” असं राऊत म्हणाले.