जालन्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर

वाढत्या उन्हामुळे जालनेकर त्रस्त आहेत. शहरातील तापमान शनिवारी आणि रविवारी ४३ अंशांवर पोहोचले होते. गेल्या दीड-दोन महिन्यांपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून मे महिना सुरू झाल्यापासून तर ती अधिकच जाणवत आहे. सात-आठ दिवसांपूर्वी उन्हाची तीव्रता किंचितशी कमी झाली होती. परंतु सध्या मात्र सकाळी ११ ते सायंकाळी पाच दरम्यान घराबाहेर पडू नये, अशी अवस्था आहे. अशा स्थितीत नेते मंडळींना वातानुकूलित वाहनातून बाहेर येऊन ४३ अंशांच्या तापमानात लग्नसमारंभाला हजेरी लावावी लागत आहे.

त्यावरील वर्दळ आणि शासकीय कार्यालयांतील गर्दी दुपारच्या वेळी कमी दिसत आहे. शितपेये आणि बाटलीबंद पेयांची विक्री वाढली आहे. परंतु मे महिन्यांत विवाहासाठी १४ मुहूर्त असल्याने कापड दुकानांवरील गर्दी मात्र भर उन्हातही वाढत आहे. काही दुकानांसमोर खरेदीसाठी आपला क्रमांक लावण्याची वाट पाहताना ग्रामस्थ दिसून येत आहेत.

जालना ही कापडाची मोठी बाजारपेठ असल्याने जिल्ह्य़ातून आणि जिल्ह्य़ाच्या बाहेरून लोक येत असतात. लगीन सराईचे दिवस असल्याने भर उन्हात ही गर्दी सध्या वाढली आहे. गेल्या एप्रिलमध्ये चार मुहूर्त होते. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी काहीशी कमी होती. येत्या जूनमध्येही १३-१४ विवाहमुहूर्त असल्याने बाजारपेठे गजबजलेली राहणार आहे.

चालू वर्षांत बाराही महिने विवाहाचे मुहूर्त असले तरी ४२ मुहूर्त मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यांतील आहेत. भर उन्हात दुपारी विवाह सोहळेही मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे कडक उन्हातही रेल्वे स्थानके आणि बसस्थानके गजबजलेली आहेत.

तर दुसरीकडे भर उन्हातही जास्तीत जास्त लग्नांना हजर राहण्यासाठी पुढारी मंडळींची ओढाताण होत आहे. पुढाऱ्यांनी विवाह सोहळ्यास हजर रहावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. पुढाऱ्यांनाही कार्यकर्त्यांला नकार देणे अवघड जाते. त्याचे कारण म्हणजे कोणत्या ना कोणत्या निवडणुका आणि पक्षांचे कार्यक्रम चालूच असतात व त्यासाठी वेळोवेळी कार्यकर्ते लागतात. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिल्हा सहकारी बँक, ग्रामपंचायत इत्यादी निवडणुका सुरूच असतात. त्यामुळे कार्यकर्ते लागतातच.

पुढाऱ्यांना आहे ते कार्यकर्ते टिकवायचे असतात, काही कार्यकर्ते इकडे-तिकडे गेले तर नवे जोडायचे असतात. ज्यांनी मते दिली त्यांचा हक्कच असतो, परंतु ज्यांनी मते दिली नाहीत त्याना पुढच्या निवडणुकीत तरी उपयोगी पडेल म्हणून चुचकारायचे

असते. अनेक कारणांमुळे पुढारी इच्छा नसली तरी भर उन्हात भली मोठी यादी सोबत घेऊन गावोगाव फिरताना दिसतात. कुठे लग्न लागून गेलेले असते. कुठे नवरदेवाचे वऱ्हाडच आलेले नसते, अशा परिस्थितीत विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हार-तुरे आणि शाल-श्रीफळ स्वीकारीत पुढारी फिरत असतात. त्यामुळे मे महिना कडक उन्हात पुढाऱ्यांची दमछाक करणारा ठरत आहे.