नामोल्लेख टाळत पृथ्वीराज चव्हाण यांचा पवार यांना टोला

मित्र पक्षांची आघाडी सन्मानपूर्वक असली पाहिजे. लोकसभा निवडणूक झाल्यावर विधानसभा निवडणुकीत आमचा गळा कापून आमच्या छाताडावर पाय ठेवून बसू नका. दुर्बलतेतून नव्हे, तर देशातील जातीयवादी सरकार घालविण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतला आहे, हे देशाचे नेतृत्व करायला निघालेल्या कोणीही मोठय़ा नेत्याने विसरू नये, असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून दिला.

इंदापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी समारंभ चव्हाण यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, नगराध्यक्षा अंकिता शहा, भरत शहा, गटनेते कैलास कदम, कृषाजी यादव, सभापती करणसिंह घोलप या वेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले,की  दुर्बलतेतून नव्हे, तर देशातील जातीयवादी सरकार घालविण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने शहरातील मतदार जोपासण्यासाठी शेतमालाच्या किंमती दाबल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जमाफी किती झाली ते हे लोक सांगत नाहीत. दूध धंदा तोटय़ात आहे. जास्त उत्पादन झाल्यावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा या सरकारकडे नाही. पाच राज्यांतील निवडणुकीत तीन राज्यातील यांची सत्ता लोकांनी घालवली. म्हणून शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये इतकी तटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे.

पाटील म्हणाले,की मताचे विभाजन होऊ  नये म्हणून आघाडी झाली आहे. मात्र आघाडीचा धर्म मित्र पक्षानेही पाळला  पाहिजे. मतदार हुशार झाला असून आम्ही मतदारांना काही सांगण्याची गरजच राहिलेली नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. विधानसभेसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा  करुनच आघाडी करावी.