गेल्या दीड-दोन महिन्यापासून पाऊस गायब झाल्यामुळे भाज्यांचे भावही आता गगनाला भिडले आहेत. मेथीची जुडी, तसेच कांद्याच्या पातीसाठी तब्बल ४० रुपये मोजावे लागत आहेत. भाज्या महागल्याने सामान्य गृहिणींचे भाजीमंडईचे गणित कोलमडून पडले आहे.
पाऊस गायब झाल्यामुळे दिवसेंदिवस सिंचनाचे क्षेत्र कमी होत आहे. उसाचा वापर चाऱ्यासाठी सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे िवधनविहिरीत पाणी उपलब्ध आहे, ते भाजीपाला पिकवत आहेत. मात्र, िवधनविहिरीतील पाणीही आता आटू लागले आहे. बाजारात सध्या ताज्या पालेभाज्यांना जोरदार भाव मिळत आहे. मेथीच्या जुडीला व कांद्याच्या पातीला ४० रुपये, पालक ३० रुपये, शेवग्याच्या शेंगा ३५ रुपये पावशेर, दोडका ३० रुपये पावशेर या भावाने विकला जात आहे. कांदे ५० रुपये किलो, तर लसूण ४० रुपये पाव किलो या भावाने विकला जात आहे. पुढच्या पंधरवाडय़ात हे भाव आणखी वाढतील. कारण स्थानिक बाजारपेठेत भाज्यांचे उत्पादनही दुरापास्त होणार आहे. शहरालगत सांडपाण्यावर उत्पादित केलेल्या भाज्याच तेवढय़ा सध्या विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहेत.
लातूरच्या बाजारपेठेत सोलापूर, परभणी, हैदराबाद अशा विविध ठिकाणांवरून शेतकरी भाज्या विक्रीसाठी आणत असत. मात्र, या वर्षी दुष्काळाचा फटका सर्वच भागात बसल्यामुळे बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. शेपू, गवार, कोबी, फुलकोबी, पडवळ, चुका याबरोबरच गावरान भाज्या तांदुळसा, तरवटा ज्या खरीप हंगामातील पावसावर येतात, त्या या हंगामात पाहायलाही मिळत नाहीत. याच दिवसात मुगाच्या शेंगा, उडदाच्या शेंगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. अन्य प्रांतातून बटाटय़ाची आवक वाढली असल्यामुळे बटाटे स्वस्तात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांचा भर आता बटाटय़ाच्या खरेदीवर अधिक आहे.