लाखो लिटर पाणी वाया; धरण परिसरातील गावांना धोका

विक्रमगड तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पातील मोहखुर्द धरणाला भगदाड पडले असून त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. सातत्याने पाणी वाहत असल्याने धरण परिसरातील गावांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ही गळती सुरू आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींना हे माहीत असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या बंधाऱ्यात पाण्याचा दबाव वाढून ते फुटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जुलैमध्ये फुटलेल्या चिपळूण तिवरे धरणासारखी परिस्थिती ओढवण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पाटबंधारे विभागाचे वेळीच खबरदारी घेण्याची मागणीही करण्यात येत आहे.

या लघु पाटबंधाऱ्याच्या भिंतीवर मोठय़ा प्रमाणात झाडे-झुडपे उगवली असून त्यांची मुळे भिंतीत रूतत असल्याने धरणाची भिंत कमकुवत बनत चालली आहे. भिंतींमधून बेसुमार गळती होत असून बंधाऱ्याच्या मधोमध आणि बाजूने पाण्याच्या धारा लागल्या आहेत. ज्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून गळतीमुळे या बंधाऱ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या बंधाऱ्याच्या पायथ्याला सजन व झाडपोली ही गावे आहेत.या गळतीमुळे दोन्ही गावातील तीन हजारांहून अधिक कुटुंबे चिंतेत पडली आहेत.  तत्काळ या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने असुरक्षित

निसर्गरम्य परिसरात मोहखुर्द असल्याने पर्यटकांना तो नेहमीच खुणावतो. मात्र या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असताना कोणतीही सुरक्षाप्रणाली किंवा सुरक्षा व्यवस्थापन या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. परिणामी याचा फायदा घेत काही मद्यपी येथे धिंगाणा घालत आहेत. हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने सध्या असुरक्षित आहे.

या धरणातून गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी ओंदे गावाकडे कालव्यातून पाणी सोडले जायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार भातपिक व भाजीपाला पिक घेता येत होते. जर पावसाळ्यातील पीक हातचे गेले तर पाटाच्या पाण्याने उन्हाळ्यातील दुबार पिकावर त्याची भरपाई निघत होती. कालव्यातून पाणी नसल्याने दुबार पिक घेता येत नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. हे कालवे पाटबंधारे विभागाने लवकर दुरुस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

– पुंडलिक सांबरे, शेतकरी, ओंदे