नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या पर्यटनात मोठी गर्दी होणार आहे. जिल्ह्य़ात पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी अपेक्षित धरून व्यावसायिकांनी जय्यत तयारी ठेवली आहे, तसेच हॉटेल आरक्षणही फुल झाले आहे.
आंबोली, तारकर्ली, कणकवली, मालवण, विजयदुर्ग, सावंतवाडी अशा भागांतील हॉटेल्स नाताळनिमित्ताने सज्ज झाली आहेत. गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्गात देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.
आंबोली थंड हवेचे ठिकाण व सागरी किनाऱ्यावरील रेडी, वेळागर, मोचेमाड, तारकर्ली, देवबाग, विजयदुर्ग अशा सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांची रीघ मोठय़ा प्रमाणात होत आहे. या हंगामातही पर्यटकांनी ठिकठिकाणी आरक्षणे करून नाताळ सुट्टीचा आनंद लुटण्याचा निश्चय केला आहे.
मालवणमध्ये सागरातील स्नॉर्केलिंगच्या आकर्षणामुळे पर्यटकांची रीघ आहे.
शिवाय माशांच्या जेवणासाठी खास पर्यटकांची रीघही लागते.
नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांसाठी सावंतवाडी नगर परिषदेने २६ ते ३० डिसेंबर कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने स्थानिक विद्यार्थी व कलाकारांना २१ ते २४ डिसेंबर कालावधीत कार्यक्रम साजरे करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या पर्यटन महोत्सवामुळे पर्यटक मोठय़ा प्रमाणात सावंतवाडीत येतील, असे अपेक्षित आहे.