अमरावती महापालिकेने विद्युत विभागातील सर्व जुने करार रद्द करताना ऊर्जा बचतीसाठी एलईडी दिवे आणि इतर साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे वर्षांकाठी सुमारे एक कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.
शहरातील पथदिव्यांची व्यवस्था ही महापालिकेकडे आहे. शहरात सुमारे २६ हजार पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पथदिव्यामध्ये साधारणत: सोडियम व्हेपर लॅम्पचा आणि फल्यूरोसंट टय़ूबलाईट्सचा वापर केला जात आहे. नियोजित विकासकामे पाहता ही व्यवस्था अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे. ऊर्जा साधनांची टंचाई लक्षात घेता अमरावती महापालिकेने सौर ऊर्जेसारख्या अपांरपारिक ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला, त्यात सौर पथदीप नियंत्रण पद्धत, उद्यांनांमध्ये सौरदिवे, सौर ऊर्जेतून फलकांवर दिवे, एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे डीपीएसडी पथदिव्यांचा वापर होत असून फेज नियंत्रणातून विजेची चालू-बंद करणारी कळ आणि चौकांवरील पथदिव्यांमध्ये ५० टक्के काटकसर असे विविध उपाय राबवण्यात आले, पण आता त्यापुढे जाऊन महापालिकेने नवीन विद्युत साहित्यांमध्ये एलईडी वापराचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात महापौर चरणजीतकौर नंदा यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना एक पत्र लिहून एलईडीच्या वापराबाबत सूचना केली होती. त्यानंतर लगेच महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या पाचही झोनअंतर्गत विद्युत साहित्याचे दरकरार रद्द करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी नवीन परिपत्रक काढले आहे, त्यात नवीन विद्युत साहित्यांमध्ये एलईडीचा वापर आणि त्यातून ऊर्जाबचतीची सूचना आहे. या परिपत्रकानुसार एलईडी दिवे आणि साहित्याचे दर हे जवळपास ४५ ते ५० टक्के कमी आहेत. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेची वर्षांकाठी १ कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.महापालिकेने एलईडी वापराचा निर्णय घेतला असला, तरी ऊर्जा बचतीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव जागृती करणे आणि त्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे महत्वाचे ठरणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांकडे स्वयंचलित किंवा हाताने कळ फिरवून वीज प्रवाह चालू-बंद करण्याची जबाबदारी असते. पथदिवे योग्यवेळी चालू किंवा बंद करण्याच्या कामात होणारी हयगय ही वीज वाया घालवण्यासाठी पुरेशी असते. यातून महापालिकेचे नुकसान होते. ही व्यवस्था स्वयंचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण अजूनही अनेक भागात दिवसभर पथदिवे सुरू असतात, अशा तक्रारी अधून-मधून येतात. महापालिकेच्या इमारतीतही विजेचा वापर करताना जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे. अनेक दालनांमध्ये विनाकारण दिवे आणि पंखे सुरू असतात. महापालिकेच्या इमारतीपासून ऊर्जाबचतीचा प्रयोग सुरू झाल्यास एलईडीतून वीज आणि पैसेबचत सार्थकी ठरू शकेल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.