केंद्र शासनाच्या आर्थिक व सामाजिक धोरणाच्या विरोधात डाव्या पक्षांतर्फे २४ जानेवारीला संपूर्ण देशात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते शमीम फैजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय समितीची तीन दिवसांची बैठक आमदार निवासात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी संपूर्ण देशातून सव्वाशे प्रतिनिधी आले आहेत. फैजी म्हणाले, केंद्रातील भाजपचे सरकारही काँग्रेसचेच दुसरे रूप आहे. मोदी सरकार सार्वजनिक हिताच्या उपक्रमांचे खासगीकरण करू पाहत आहे. हे सरकार संघाच्या विचारसरणीनुसार चालत आहे. देशातील नागरिकांना धर्माच्या नावावर वेगळे करीत आहे. हे लोकशाही देशासाठी घातक आहे. त्यामुळे देशातील सहा डाव्या पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध करण्याचे ठरवले आहे.
आजची देशाची स्थिती पाहून भाकप, माकप, फॉरवर्ड ब्लॉक, आर.एस.पी., सोशालिस्ट युनिटी सेंटर (कम्यु), सीपीआय (मा-ले) हे सहा डावे पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मार्चमध्ये पाँडेचरी येथे होणाऱ्या भाकपच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात येत आहेत. केंद्र सरकार अमेरिकेच्या दबावाखाली वागत आहे. त्यामुळे यानिमित्त ओबामा यांचाही विरोध करण्यात येणार असल्याचेही फैजी यांनी सांगितले.
आठ महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर डाव्या पक्षांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे, परंतु ही स्थिती बदलेल, असा आशावाद भाकपचे ज्येष्ठ नेते खासदार डी. राजा यांनी याप्रसंगी व्यक्त केला. केंद्रातील भाजपचे सरकार यापूर्वीच्या काँग्रेसचेच धोरण राबवत असल्याचा आरोप करण्यात आला.