घोडेबाजार तेजीत, ‘लक्ष्मीदर्शना’चीच चर्चा

नितीन पखाले, लोकसत्ता

यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत घोडेबाजाराने उच्चांक गाठल्याची चर्चा आहे. मतदारांना लक्ष्मीदर्शन घडविण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून मतदारांनाही भारतदर्शनही घडविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

यवतमाळमध्ये बाहेरचा उमेदवार देण्याची परंपरा शिवसेनेने कायम ठेवली आहे. २०१० आणि त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थेत घोडेबाजार तेजीत आला. तोच कित्ता या वेळी गिरविण्यात येत आहे. मतदारांना रोख बक्षीस देण्याबरोबरच आणि त्यांच्या पर्यटनावर खर्च केला गेल्याची चर्चा आहे.

निवडणूक रिंगणात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही मुख्य पक्षांचे मतदार गेल्या १० दिवसांपासून भारतात विविध ठिकाणी पर्यटन करत आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीसह इतर आणि अपक्ष असे ३१७ मतदार आग्रा, वाघा बॉर्डर, बंगळुरू, उटी, हैदराबाद, पेंच आदी ठिकाणी पर्यटन करून हवाईमार्गे गुरुवारी सकाळी नागपुरात परतले. नागपूर येथील एका रिसॉर्टमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित ‘कॅम्प’साठी हे सर्व जण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने हैदराबाद येथे पर्यटनास पाठविलेल्या मतदारांना दोनच दिवसांत परत बोलाविल्याने काही मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. बाहेरचा उमेदवार नको, या मुद्दय़ावर स्थानिक अपक्ष उमेदवाराचा आक्षेप महाराष्ट्र विकास आघाडीने मोडीत काढला. या ‘उलाढाली’त अपक्षांनी सपशेल माघार घेतल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीत एकूण ४८९ मतदार असले तरी महाविकास आघाडीने आपल्याकडे ३३०, तर भाजपनेही ३०० मतदार असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या या दाव्यांमुळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ‘क्रॉस व्होटिंग’ होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून महाविकास आघाडीने मतदारांना सुरक्षा कवचात ठेवले आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही पक्ष दक्षता घेत आहे. दोन्ही पक्ष विविध ठिकाणी ठेवलेल्या मतदारांना शुक्रवारी पहाटे जिल्ह्य़ातील सात मतदान केंद्रांकडे रवाना करतील. मतदान केंद्रामध्ये पेन, मोबाइल, कागद यापैकी काहीही घेऊन जाता येणार नसल्याने आपल्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मतदान केले हे जाणून घेण्यासाठी मतदारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दुष्यंत सतीश चतुर्वेदी आणि भाजपकडून सुमित बजोरिया या दोघांमध्ये लढत होत आहे.

दोन्ही उमेदवार तगडे असल्याने चुरस वाढली. तानाजी सावंत यांची विधानसभेवर निवड झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. सावंत यांना मंत्रिपद नाकारल्याने ते भाजपच्या जवळ गेल्याची चर्चा सुरू झाली. सावंत यांचे समर्थक भाजपला मदत करतील, अशी चर्चा सुरू झाली. भाजपचे बजोरिया हे राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बजोरिया यांचे बंधू असल्याने राष्ट्रवादीची मदत होऊ शकते, असे भाजपच्या गोटातून पसरविले जात आहे. उभय बाजूने पैशांचा पाऊस पाडण्यात आल्याची चर्चा आहे.

घोडेबाजारास थारा नाही

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणताही घोडेबाजार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी दिली. महाविकास आघाडी एकसंध आहे आणि तिन्ही पक्षांसह अपक्ष आणि इतर असे ३३० मतदार आमच्याकडे असल्याने घोडेबाजार करून मतदारांना खरेदी करण्याची काहीच गरज नाही. महाविकास आघाडीत घोडेबाजारास थारा नाही, विरोधी पक्ष अशी कामे करतात, असा टोला पिंगळे यांनी भाजपला लगावला.

विधान परिषद बरखास्त करा!

निवडणुकीत सुरू असलेल्या घोडेबाजारामुळे व्यथित झालो असून आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही विधान परिषद बरखास्त केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार तथा यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली आहे. हे आपले व्यक्तिगत मत असून विधान परिषदेसारखे वरिष्ठ सभागृह धनदांडगे आणि कंत्राटदार, दलाली करणाऱ्यांसाठी राजकारणात येण्याचा सोईचा मार्ग झाला आहे. तो राज्याच्या हितासाठी बंद झाला पाहिजे, असे तिवारी म्हणाले.