News Flash

यवतमाळमध्ये काँग्रेसविरोधक एकवटले

भाजपचे राज्यमंत्री मदन येरावार यांचे प्रयत्न सुरू आहेत.

तानाजी सावंत

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पानिपत झालेल्या काँग्रेसला विधान परिषेदतही तसाच धक्का देण्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सारेच एकत्र आले आहेत. शिवसेनेने शिक्षण आणि साखरसम्राट तानाजी सावंत यांना बाहेरून येथे आयात केले असून, त्यांनी सारी ‘ताकद’ पणाला लावली आहे. सावंत यांची ‘जादू’ किती चालते यावरच निकाल अवलंबून आहे.

यवतमाळ मतदारसंघातून गेल्या वेळी राष्ट्रवादीचे संदीप बजोरिया हे शिवसेना व भाजपच्या मदतीने निवडून आले होते. यंदाही याचीच पुनरावृत्ती होईल या आशेवर बजोरिया यांनी अपक्ष म्हणून अर्जही दाखल केला होता. पण बजोरिया यांच्या विरोधात राष्ट्रवादीतच असलेली नाराजी व पुरेसे संख्याबळ नसल्याने बजोरिया यांनी माघार घेत शिवसेनेच्या सावंत यांना पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेचे सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे अशी दुरंगी लढत आता होत आहे.

काँग्रेसला धूळ चारण्याकरिता शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड आणि भाजपचे राज्यमंत्री मदन येरावार यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे सावंत आर्थिकदृष्टय़ा तगडे असल्याने मतदारांना साहजिकच त्यांच्याबद्दल आकर्षण आहे. या तुलनेत काँग्रेसचे शंकर बडे कमी पडत आहेत. पांढरकवडय़ाचे माजी नगराध्यक्ष असलेले बडे हे काँग्रेस नेते, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे निकटवर्तीय मानले जातात. काँग्रेसच्या मतांमध्ये किती फूट पडते यावरही सारे अवलंबून आहे. घोडाबाजारात अश्वांचे भाव १० ते १५ लाखांवर जातील, अशी चर्चा होती, पण काँग्रेस उमेदवाराचा दम पुरणार नाही, हे लक्षात घेऊन सेनेकडून ‘आहिस्ता आहिस्ता’चे धोरण आखले गेले. तीन टप्प्यात हिशेब चुकते करण्याचे आश्वासन दिले जात आहे. ‘जिधर जादा दम उधर है हम’ अशी मतदारांची मानसिकता आहे, त्यामुळे सेनेचे तानाजी सावंत सध्या तरी आघाडीवर आहेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद या निवडणुकीवर उमटले आहेत. ‘सारे काही लक्ष्मीदर्शनाने होत नाही. उस्मानाबादहून आयात केलेल्या बाहेरच्या उमेदवाराला मतदार स्वीकारणार नाहीत,’ असा विश्वास काँग्रेस नेते विधान परिषद उपसभापती आमदार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

बाहेरचा उमेदवार आयात करताना शिवसेनेने केलेला युक्तिवादही हास्यास्पद आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकरी आत्महत्या कमी करण्याकरिताच सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा केला जातो. उस्मानाबाद जिल्ह्य़ात जलाशयांची काही कामे सावंत यांनी केली. यातूनच आत्महत्या कमी झाल्या, असा शिवसेनेचा दावा आहे. उस्मानाबाद आणि यवतमाळमधील परिस्थितीच वेगळी आहे.

ही निवडणूक कागदावरील गांधीविरुद्ध विचारांचे गांधी, अशी आहे. बाहेरचा उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्य़ाच्या राजकीय अस्मिता आणि आत्मसन्मानाला ठेच लागणार आहे म्हणून मतदार लक्ष्मीदर्शनापेक्षा सदसद्विवेकबुद्धीला स्मरून ‘आत्मा की आवाज’ ऐकून काँग्रेसला विजयी करतील. – शिवाजीराव मोघे, माजी मंत्री

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ाला लागलेला कलंक पुसण्यासाठी तानाजी सावंत यांची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूर्वक संयुक्तपणे दिली आहे. विरोधक वापरत असलेला ‘धनदांडगे’ हा शब्द अनाठायी आहे. शिवजलक्रांतीने उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघ तानाजी सावंत यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त केले आहेत.  – संजय राठोड, शिवसेना नेते

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:22 am

Web Title: legislative council election in yavatmal district
Next Stories
1 चलनटंचाईने दोन टप्प्यांत मतदारांची ‘सरबराई’?
2 ‘नोटाबंदी’चा विषय पालिका निवडणूक प्रचारातही
3 धुळ्यात रांगा कायम, गर्दीत घट
Just Now!
X